मुंबई : शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमीडिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चा निकाल जानेवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात आला. त्यामुळे शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळण्यासाठी ऐन दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर शाळांची धावपळ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यास १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून यामुळे शाळांना दिलासा मिळाला आहे.

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालामध्ये सवलतीचे अतिरिक्त गुण दिले जातात. यासंदर्भात शाळांना विद्यार्थ्यांचे प्रस्ताव राज्य मंडळाकडे सादर करणे बंधनकारक आहे. प्रस्ताव सादर न झाल्यास विद्यार्थी या सवलीतीच्या अतिरिक्त गुणांपासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा प्रस्ताव शाळांकडे सादर करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

शाळांना हे प्रस्ताव संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी अंतिम तारीख १५ जानेवारी होती. मात्र महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमीडिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चा निकाल जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला. निकाल विलंबाने शाळांना आवश्यक प्रमाणपत्रे, सहभाग नोंदी आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांकडून यासाठी मुदतवाढीची मागणी होत होती.

या पार्श्वभूमीवर कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी मंडळाने ही सवलत जाहीर केली. त्यानुसार शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव शाळांनी विभागीय मंडळांकडे सादर करण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र ऐन परीक्षाच्या तोंडावर शाळांची प्रस्ताव सादर करण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी शाळांना १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परीक्षेच्या तोंडावर कागदपत्रे संकलन आणि प्रस्ताव सादरीकरणाची धांदल उडाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाच्या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात देण्यात आलेली मुदतवाढ सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देवून त्याप्रमाणे मुदतीत कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे. तसेच अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शिक्षक व संबंधित विभागांना तातडीने प्रस्ताव प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, विद्यार्थ्यांनाही आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी व कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना दिल्या आहेत.