मंदिरातील भिंतीत मृतदेह आढळला

दहिसरच्या प्रख्यात विठ्ठल मंदिराच्या स्वयंपाकघरातील नाल्याच्या भिंतीत दडवलेला मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला. दत्तू अटापल्ली (४०) असे मृताचे नाव असून तो याच परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता.

दहिसरच्या प्रख्यात विठ्ठल मंदिराच्या स्वयंपाकघरातील नाल्याच्या भिंतीत दडवलेला मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला. दत्तू अटापल्ली (४०) असे मृताचे नाव असून तो याच परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता.
दहिसर पूर्वेला आनंदनगरातील या मंदिराच्या चौथ्या मजल्यावर स्वयंपाकघर आहे. मंदिरात स्वामी आल्यावर त्याचा वापर केला जातो. स्वयंपाकघरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी छोटा नाला बांधला गेला आहे. या नाल्याचे पाइप बाहेर दिसू नये म्हणून त्याला भिंत घालण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी या मंदिरात काही स्वामी वास्तव्यासाठी आले होते. दोन दिवसांपासून नाल्यातील सांडपाणी जात नव्हते. त्यामुळे एक कर्मचारी दुरुस्तीसाठी वर गेला. नाल्याच्या भिंतीची एक लादी त्याने काढली असता त्याला मृतदेहाचा हात दिसला. या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी धाव घेतली आणि भिंतीचे पाइप काढून मृतदेह बाहेर काढला. मृत अटापल्ली याची ओळखही पटली. ३० डिसेंबरपासून तो बेपत्ता होता. तो मुलासमवेत राहात होता. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. नाल्याचे पाइप दिसू नयेत म्हणून भिंत बांधून त्यावर लाद्या बसविल्या होत्या. आत पोकळ जागा होती. मारेकऱ्यांना या रचनेची माहिती होती. त्यामुळे त्यांनी मृतदेह लपविण्यासाठी या जागेचा वापर केला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Body found in the temple of the wall