मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ रविवारी मध्यरात्री सापडलेली मृत तरुणी गर्भवती असल्याची शक्यता तिच्या शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी वर्तविली. या तरुणीच्या शरीराचा कमरेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग पोत्यात भरलेल्या अवस्थेत पोलिसांना सी लिंकजवळ मिळाला होता. हा मृतदेह लगेचच शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. संबंधित तरुणी २० ते ४० वयोगटातील असण्याची आणि मृतदेह मिळाल्याच्या सुमारे ४८ तासांपूर्वी तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. या तरुणीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धारदार शस्त्राने तिचे तुकडे केल्याची शक्यता आहे. 
रेक्लेमेशनच्या किनाऱ्याच्या पट्ट्याजवळ दुर्गंध येत असल्याची तक्रार तिथल्या नागरिकांनी केली. त्यानंतर तिथे आलेल्या पोलिसांना पोत्यात भरलेल्या तरुणीचा तुकडे केलेला मृतदेह सापडला. संबंधित तरुणीचे बाकीचे अवयव गायब आहेत. त्याचाही पोलिस कसून शोध घेत आहेत. सुनियोजित पद्धतीनं या तरुणीची हत्या करून तिचे तुकडे वेगवेगळ्या पिशवीत भरून रेक्लेमेशन आणि वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फेकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.