मुंबई: किमान विद्यार्थी पट नाही, पात्र प्राध्यापक नाहीत, त्याचप्रमावणे शिक्षणासाठी आवश्यक प्रयोगशाळा, ग्रंथालये, मैदाने या सुविधाही नसलेली १२३ बोगस महाविद्यालये राज्यात सुरू असल्याची बाब उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आहे. सरकारनेच याविषयीची कबुली दिली असून यामुळे या महाविद्यालयांत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बोगस महाविद्यालयांविषयी निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावरील लेखी उत्तरात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तरात कायद्यानुसार अनिवार्य निकष पूर्ण न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांची यादी सादर केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विविध विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा नाहीत. या महाविद्यालयांनी विविध राज्य सार्वजनिक विद्यापीठांतर्गत शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या निर्णयांची निकषांची पूर्तता केलेली नाही.

विद्यापीठांकडून संलग्नता प्रदान करताना किंवा तिचे नूतनीकरण करताना निकषांचे पालन होते की नाही याची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून कोणती यंत्रणा कार्यरत आहे, बोगस महाविद्यालयांवर कोणती कारवाई करण्यात येते असा सवालही डावखरे यांनी उपस्थित केला. यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.

या महाविद्यालयांची मान्यता रद्द होणारमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०८ अन्वये संलग्नीकरण आणि मान्यतेसाठी अटी-शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. तसेच कलम ११७ अन्वये महाविद्यालयाचे व मान्यताप्राप्त परिसंस्था यांची तपासणी व अहवालाबाबत आणि कलम १२० अन्वने संलग्नता आणि मान्यता काढून घेण्याबाबत तरतूद आहे. यानुसार अनिवार्य निकषांची पूर्तता करीत नसलेल्या महाविद्यालयांबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.

विभागनिहाय महाविद्यालयांची संख्या

कोकण विभाग – २
अमरावती विभाग – २०
पुणे विभाग – ३
नागपूर विभाग – १२
नाशिक विभाग – ५
छत्रपती संभाजीनगर – ८१
एकूण – १२३