मुंबई : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विरार आणि बोईसर स्थानकांदरम्यानच्या सह्याद्री पर्वतरांगेतून ‘डोंगराळ बोगदा क्रमांक ६’चे खोदकाम मंगळवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे आश्विनी वैष्णव यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे खोदकामाची पाहणी केली. बुलेट ट्रेनच्या बोईसर स्थानकाद्वारे वाढवण बंदराशी जोडण्यात येणार असून पालघर परिसराचा औद्योगिक विकास करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरणार असल्याचा दावा नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशनने केला.

जपानच्या धर्तीवर देशात बुलेट ट्रेनचे जाळे विणले जात असून भविष्यात प्रवाशांना वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येईल. नुकत्याच सादर झालेल्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्यात आणखी दोन बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. यात मुंबई पुणे आणि पुणे – हैदराबाद असे मार्ग असतील.

सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील डहाणू येथील ‘डोंगराळ बोगदा क्रमांक ६’ ४५४ मीटर लांबीचा आणि १४.४ मीटर रुंदीचा आहे.हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग (एनएटीएम) पद्धतीने खोदण्यात आला. ‘डोंगराळ बोगदा क्रमांक ५’चे खोदकाम २ जानेवारी २०२६ रोजी झाले. या बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रामधील सह्याद्री भागातील बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या मुंबई-अहमदाबाद ५०८ किमी लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प गुजरात आणि दादरा व नगर हवेली दरम्यान ३५२ किमी आणि महाराष्ट्रात १५६ किमी अंतराचा आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १.०८ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ३० जानेवारी २०२६ पर्यंत सुमारे ३३४ किमी व्हायाडक्ट्स, १७ नदी पूल आणि राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे व इतर पायाभूत सुविधांवर १२ प्रमुख क्रॉसिंग्स पूर्ण झाले आहेत.

महाराष्ट्रात विविध टप्प्यात बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पातील सर्वाधिक लांबीच्या वैतरणा नदीवर पुलाच्या पिअरचे काम झाले आहे. तर उल्हास आणि जगणीसारख्या इतर प्रमुख नद्यांवर फाउंडेशनचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व चार स्थानकाचे कामे जलदगतीने सुरू आहे. तसेच पालघर जिल्ह्यात एकूण ७ डोंगराळ बोगद्याचे काम सुरू आहे.

पालघरमधील हे बोगदे प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग आहेत. डोंगराळ बोगदा क्रमांक ५ नंतर ६ चे काम एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणे हे भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मोठे यश आहे. आता उर्वरित बोगद्यांचे काम वेगाने काम सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता महाराष्ट्रात वेगाने पूर्ण होत आहे. पुढील वर्षी बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा बिलीमोरा – सुरत सेवेत दाख होईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.