मुंबई : बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने त्याला परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) बजावलेल्या नोटिशीला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटीसद्वारे त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याचिका शुक्रवारी किंवा सोमवारी एमझेडएम लीगलचे वकील झुल्फिकार मेमन यांच्यामार्फत दाखल केली जाणार आहे आणि मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर ती सादर केली जाईल. त्यानंतर, त्यावर तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
इमरान याच्यावरील ही प्रशासकीय कारवाई १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या एका निदर्शनादरम्यान त्याला ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर करण्यात आली आहे. ही निदर्शने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात करण्यात आली होती.
या निदर्शनानंतर, भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अमेरिकेचे नागरिक असलेला इमरान याने राजकीय मोर्चामध्ये सहभागी होऊन ‘फॉरेनर्स ॲक्ट’चे उल्लंघन केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांची ही तक्रार गावदेवी पोलिसांनी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी ‘एफआरआरओ’कडे पाठवली होती. या तक्रारीची दखल घेऊन इमिग्रेशन प्राधिकरणाने इमरान याला देश सोडण्याची नोटीस बजावली होती.
दरम्यान, ‘एफआरआरओ’ने इमरान नोटिशीद्वारे त्याच्या अमेरिकन नागरिकत्वाचा उल्लेख करण्यात आला असून, निदर्शनातील त्याचा सहभाग हा इमिग्रेशन व परदेशी नागरिकांशी संबंधित नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. इमरान याला २८ ऑक्टोबर रोजी वा त्यापूर्वी भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमरान हा ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ कार्डधारक आहे.
कायदा काय सांगतो ?
२००५ च्या ‘ओसीआय’ धोरणांतर्गत, भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना भारतात येण्यासाठी व राहण्यासाठी आजीवन व्हिसा मिळतो. परंतु, यामुळे त्यांना भारतीय नागरिकत्व वा मतदान करणे, निवडणूक लढवणे यासारखे राजकीय अधिकार मिळत नाहीत. स्थलांतर व परदेशी नागरिक कायद्यांतर्गत, केंद्र सरकारला कोणत्याही परदेशी नागरिकाला भारतात वा भारतातील विशिष्ट भागात न राहण्याचे आदेश देण्याचा अधिकार आहे.
