बॉलिवूड म्हणजे ड्रग्ज, शोषण आणि नेपोटिझमचे गटार आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा केली आहे. खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससह एकूण ३८ प्रॉडक्शन हाऊसेसनी काही मीडिया हाऊसेसविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याविरोधात प्रतिक्रिया देताना कंगनाने बॉलिवूड हे एक ड्रग्ज, शोषण आणि नेपोटिझमचे गटार आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या निमित्ताने हे गटार स्वच्छ होतंय तर या लोकांची नेमकी समस्या काय? असाही प्रश्न तिने विचारला आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांचं पितळ उघडं पाडत राहणार असाही इशारा कंगनाने दिला आहे.

नाव कमावलेले अभिनेते हे तरुण मुलींचं शोषण करतात. सुशांत सारख्या अभिनेत्यांनी पुढे यावं असं त्यांना मुळीच वाटत नाही. वयाची पन्नाशी गाठली असेल तरीही सिनेमांमध्ये कॉलेज आणि शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिका या बड्या अभिनेत्यांना करायच्या असतात असाही टोला कंगनाने लगावला आहे.

सिनेसृष्टीतलं एक रहस्य मी आता उघड करते, तिथे असा अलिखित करार आहे की तू माझी काळी बाजू घाणेरडी बाजू लपव मी तुझी लपवेन. एकमेकांबद्दल आदर राखण्यासाठी फक्त एवढंच केलं जातं. मी लहानपणापासून हेच पाहात आले आहे की काही मूठभर लोकांच्या हातीच सिनेसृष्टीचं सूत्रं आहेत हीच माणसं सिनेसृष्टी चालवतात हे सगळं कधी बदलणार असाही प्रश्न कंगनाने विचारला आहे.