प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर अचानक पोलीस कुमक वाढते.. शीघ्र कृती दलाचे जवान बुटांची धडधड करत स्थानक परिसरात शिरतात.. अग्निशमन दलाचे बंब भोंगा वाजवत दाखल होतात.. श्वानपथकातील श्वानांकडून बॅगांची तपासणी सुरू होते.. मात्र ही सगळी तपासणी व्यर्थ ठरून बॉम्ब ठेवल्याची बातमी देणारा निनावी दूरध्वनी केवळ अफवा असल्याचे स्पष्ट होते. मध्य रेल्वेवर हा प्रकार गेल्या पाच दिवसांत पाच वेळा घडला. मात्र ‘लांडगा आला रे, आला..’वरून धडा घेऊन यापैकी एकाही दूरध्वनीकडे दुर्लक्ष केले गेलेले नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर देशभरात बॉम्बच्या अफवांचे पेव फुटले असताना मध्य रेल्वेही त्याला अपवाद नाही. मात्र मध्य रेल्वेवर गेल्या वर्षभरात १२ घटना घडल्या आहेत. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पाचवेळा आलेल्या दूरध्वनींची सुरुवात २३ जानेवारी रोजी दादर, मानखुर्द या स्थानकांत बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्या दूरध्वनीपासून झाली. देशभरात आयसिसच्या हस्तकांना होणाऱ्या अटकेच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाने हा प्रकार गांभीर्याने घेत तातडीने तपासणी केली. याच दिवशी रबाळे स्थानकावरही बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आला. प्रजासत्ताक दिनी विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांवर ताण आला. मात्र, ही अफवा असल्याचे यंत्रणांनी निदर्शनास आणले. बुधवारी पुन्हा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आला. दूरध्वनीचे प्रमाण वाढले म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सातत्याने असे दूरध्वनी करून काही दिवसांनी यंत्रणांना गाफील ठेवण्याचा डावही असू शकतो. त्यामुळे आम्ही सतर्क राहणार आहोत, असे रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.