मुंबई : जामिनाच्या प्रतिक्षेत असताना निधन झालेले धर्मगुरू स्टॅन स्वामी यांच्या नावामागे शहरी नक्षलवादाच्या प्रकरणामुळे आरोपांचा लागलेला ठपका दूर करण्याच्या दृष्टीने नव्याने याचिका करण्याची मुभा उच्च न्यायालयाने स्वामी यांचे सहकारी मुंबईतील फादर फ्रेझर मस्कारेन्हास यांना बुधवारी दिली.

स्वामी यांच्या निधनानंतर त्यांनी केलेली याचिका आपल्याला पुढे चालवू देण्याची मागणी फादर फ्रेझर यांनी केली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

स्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळताना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापना विशेष न्यायालयाने स्वामी यांच्याबाबत काही निरीक्षणे नोंदवली होती. त्याला स्वामी यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे स्वामी यांची ती याचिका पुढे चालवू देण्याची आणि त्यांच्या नावामागे शहरी नक्षलवादाच्या प्रकरणामुळे आरोपांचा लागलेला ठपका दूर करण्यासाठी नव्याने याचिका करण्यास परवानगी देण्याची मागणी फादर फ्रेझर यांनी केली होती.

स्वामी यांचा शहरी नक्षलवादाप्रकरणी सहभाग असल्याचा सकृतदर्शनी पुरावा असल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने त्यांना जामीन नाकारताना नोंदवले होते.