मुंबई : अल्पवयीन मुलाचा तात्पुरता ताबा वडिलांकडे सोपवण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. मुलाच्या हिताचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्याऐवजी, संबंधित न्यायाधीशांनी पत्नीच्या भूमिकेबाबतच्या ‘प्रतिगामी’ आणि ‘साचेबद्ध’ समजुतींवर अवलंबून राहून हा निर्णय घेतल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मुलाच्या आईने दाखल केलेले अपील मंजूर केले आणि मुलाचा ताबा तिच्याकडेच कायम ठेवण्याची परवानगी दिली. त्याचवेळी, सिंगापूरमध्ये राहणाऱ्या वडिलांना दर तीन महिन्यांतून एकदा मुलाला प्रत्यक्ष भेटण्याची आणि आठवड्यातून किमान एकदा दृकश्राव्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधण्याची मुभा न्यायालयाने दिली.
प्रकरणाशी संबंधित जोडप्याचा विवाह २०१२ मध्ये झाला होता आणि २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. हे कुटुंब २०२२ मध्ये सिंगापूरला स्थायिक झाले. कौटुंबिक वादामुळे, मार्च २०२५ मध्ये महिला मुलासह पुण्यात परतली आणि तेव्हापासून मुलगा तिच्यासोबतच आहे. त्यामुळे, पतीने मुलाचा तात्पुरता ताबा आणि त्याला सिंगापूरला नेण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती.
यापूर्वी उच्च न्यायालयाने हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयाकडे पुनर्निर्णयासाठी पाठवले होते आणि पालकांमधील वादापेक्षा मुलाच्या हितावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कौटुंबिक न्यायालयाने पुन्हा एकदा पती-पत्नीमधील ‘आरोप आणि प्रत्यारोपांवर’ भर दिला आणि केवळ आईच्या कथित चुकांवरच लक्ष केंद्रित केल्याचे उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना नमूद केले.
कौटुंबिक न्यायालयाच्या निष्कर्षावर टीका
पत्नीने ‘पतीप्रती असलेली पत्नीची पवित्र कर्तव्ये’ पार पाडण्यात आणि ‘घर सांभाळण्याच्या भूमिकेत’ कथित अपयश दर्शवल्याबद्दल कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केलेल्या निरीक्षणांवर खंडपीठाने आदेशात प्रामुख्याने टीका केली. अशा संकल्पना आईसाठी ‘परक्या’ वाटतात आणि तिच्यासोबत ‘मुलाचे भविष्य सुरक्षित नाही’ अशी टिप्पणी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली होती व महिलेच्या विरोधात निर्णय दिला होता. तथापि, अशी निरीक्षणे ‘अनावश्यक, निराधार आणि प्रतिगामी’ होती आणि ती वैवाहिक संबंधांबद्दलच्या साचेबद्ध समजुतींना बळकटी देणारी होती, असे निरीक्षणही न्यायमूर्ती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना नोंदवले.
आदेश देऊनही त्याच चुका
प्रकरणातील वस्तुस्थितीशी थेट संबंध नसतानाही अशी निरीक्षणे नोंदवताना न्यायाधीशांनी विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे, असे खंडपीठाने नमूद केले. कौटुंबिक न्यायालयाला मुलाच्या हिताचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करणे आवश्यक होते. त्यामुळे, पती-पत्नीचे एकमेकांबद्दलचे वर्तन आणि कौटुंबिक न्यायालयासमोर असलेला मुख्य मुद्दा यांचा फारसा संबंध नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. हा मुलगा येथील वातावरणात स्थिरावला असून शाळेत जात आहे. तसेच, त्याचे त्याच्या आईकडील आजी-आजोबा, विस्तारित कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्याशी भावनिकदृष्ट्या घट्ट नाते आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. कौटुंबिक न्यायालय मुलाच्या”शारीरिक, भावनिक, शैक्षणिक किंवा मानसिक हिताचे ” स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी त्यांनी अप्रासंगिक बाबी आणि पूर्वग्रहांवर अवलंबून राहून निर्णय घेतला, अशी टीका न्यायालयाने केली.
