scorecardresearch

राष्ट्रगीत अवमान प्रकरण : ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयाचा तडाखा; दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधातील अपील फेटाळले

न्यायालयाने ममता यांच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला. तसेच ममता यांचे अपील फेटाळले.

mamta
ममता बॅनर्जी

मुंबई : राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत नव्याने निर्णय घेण्यासंदर्भात विशेष न्यायालयाने महानगरदंडाधिकारी न्यायालयाला दिलेल्या आदेशाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेले अपील  उच्च न्यायालयाने फेटाळले. 

डिसेंबर २०२१ मध्ये ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. मात्र राष्ट्रगीत सुरू असताना ममता या जागेवरच बसूनच होत्या. ते संपताना त्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या. ममता यांचे वर्तन हे राष्ट्रगीताचा अपमान करणारे असल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात भाजपचे स्थानिक पदाधिकारी वकील विवेकानंद गुप्ता यांनी शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा >>> “नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास खुनशी पद्धतीने बेघर करणं…”; राहुल गांधींवरील कारवाईवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

या तक्रारीची दखल घेऊन महानगरदंडाधिकाऱ्यांनी ममता यांना समन्स बजावले होते. त्याविरोधात ममता यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. विशेष न्यायालयाने ममता यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा आणि समन्स बजावण्याचा शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला होता. मात्र, त्याचवेळी ममता यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवर नव्याने विचार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात ममता यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठासमोर बुधवारी ममता यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने ममता यांच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला. तसेच ममता यांचे अपील फेटाळले.

ममता यांचा दावा विशेष न्यायालयाने समन्स रद्द करताना गुप्ता यांच्या तक्रारीवर नव्याने विचार करण्याचे आदेश द्यायला नको होते, असा दावा ममता यांनी याचिकेत केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 12:23 IST

संबंधित बातम्या