मुंबई : आंतरजातीय विवाहामुळे जिवे मारण्याची धमकी मिळालेल्या तरुण जोडप्याला संरक्षण देण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी संताप व्यक्त केला. कोणीतरी परराज्यातून महाराष्ट्रात, तेही मुंबईत येऊन हिंसाचार करून जाते आणि पोलीस काहीच करत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणीही केली. तसेच या घटनांची पुनरावृत्ती आम्हाला नको असल्याचेही बजावले.
न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर या प्रकरणातील पोलिसांच्या निष्क्रियतेची चौकशी करण्यात येईल. तसेच पोलिसांकडून झालेल्या चुकांचीही चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी न्यायालयाला दिली.




संबंधित जोडप्याला संरक्षण देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तसेच आदेशानंतरही तरुणीच्या दुसऱ्या पतीने गुजरातहून मुंबईत येऊन तरुणाच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची व तो जामिनावर सुटल्याची दखल न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने घेतली. तसेच पोलीस आयुक्त नगराळे यांना दूरचित्रसंवादाच्या किं वा प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून आदेशाची अंमलबजावणी का केली नाही याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.