मुंबई : न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास सुनावण्यात आल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर अभ्यार्पण करण्याऐवजी ऑर्बिट व्हेंचर्सचे राजेन ध्रुव आणि हिरेन ध्रुव हे दोन व्यावसायिक फरारी झाले. त्यामुळे या दोघांचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक करण्याचे व न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना आदेश दिले होते. मात्र त्याबाबतचा अहवाल सादर न केल्याने न्यायालयाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. सायंकाळी पोलिसांनी राजेन व हिरेन यांच्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने दंडाचा आदेश मागे घेतला. 

न्यायमूर्ती के. आर श्रीराम आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने संबंधित बँका आणि वित्तीय संस्थांना या दोन्ही व्यावसायिकांची खाती गोठवण्याचे, त्यांचे विविध मार्गाने केले जाणारे बँक व्यवहार थांबवण्याचे आदेशही दिले होते.

दिलेल्या हमीचे पालन केले नाही म्हणून न्यायालयाने या दोघांना अवमान प्रकरणी दोषी ठरवून त्यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच दोघांनी शुक्रवारी न्यायालयासमोर अभ्यार्पण करावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु दोघेही न्यायालयासमोर हजर होण्याऐवजी फरारी झाले. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांचा शोधून त्यांना अटक करावी व न्यायालयासमोर हजर करावे, असे आदेशही े पोलीस आयुक्तांना दिले होते. सोमवारच्या सुनावणीत पोलीस आयुक्तांनी आदेशावरील कार्यवाहीचा अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र तो सादर केला गेला नाही.