मुंबई : बनावट पीएच.डी. पदवी प्रकरणात गेल्या दीड महिन्यापासून अटकेत असलेल्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. राऊत यांच्यावरील छळवणुकीच्या आरोपानंतरच आपल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि अटक करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर या महिलेने जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अ‍ॅड्. आभा सिंह यांच्यामार्फत या महिलेने उच्च न्यायालयात याचिका केली होती.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी या महिलेला जामीन मंजूर केला. याचिकाकर्तीला अटक करून बराच काळ लोटला आहे. त्यामुळे तिच्या चौकशीसाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला आहे, असे न्यायालयाने तिला जामीन मंजूर करताना नमूद केले. त्याच वेळी याचिकेवर निकाल दिला जाईपर्यंत याचिकाकर्तीने मानसोपचारतज्ज्ञ वा समुपदेशक म्हणून काम करू नये, पारपत्र पोलिसांकडे जमा करावे, तपासात सहकार्य करण्यासह अन्य अटीही न्यायालयाने घातल्या.