मालमत्तेसाठी वृद्ध मातापित्याच्या छळवणुकीत वाढ ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; गायिका श्वेता शेट्टीला वडिलांचे घर सोडण्याचे आदेश

वडिलांचे घर सोडण्याचे आदेश देण्याचा लवादाला अधिकार नसल्याचा दावा श्वेताच्या वतीने करण्यात आला होता.

मुंबई  : मालमत्तेसाठी मुलांकडून विशेषत: उच्चभ्रू वर्गातील मुलांकडून वृद्ध आई, वडिलांची छळवणूक करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वडिलांच्या घरावर आपला हक्क असल्याचे सांगत उच्च न्यायालयात धाव घेणारी गायिका श्वेता शेट्टी हिची याचिका फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. तसेच वडिलांचे घर तातडीने सोडण्याचे आणि त्यात पुन्हा प्रवेश न करण्याचे आदेशही न्यायालयाने श्वेता शेट्टी हिला दिले.

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींसाठी स्थापन केलेल्या लवादाच्या आणि मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील वडिलांचे घर सोडण्याबाबत दिलेल्या आदेशाला श्वेताने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निकाल सुनावताना न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी मालमत्तेसाठी मुलांकडून वृद्ध मातापित्यांचा छळ होत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला.

वडिलांच्या मालमत्तेत श्वेता तिचा वाटा मागत आहे. परंतु ते जिवंत असताना त्यांच्या मालमत्तेत तिचा ‘वाटा’ काहीच नाही. तिचे वृद्ध वडील दक्षिण मुंबईतील आपले घर आणि सर्व संपत्ती तिला देऊ शकतात. मात्र तो त्यांचा हक्क आहे आणि त्यांना तसे करण्यापासून रोखू शकत नाही. ते जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत श्वेताला त्यांच्या मालमत्तेत ‘हिस्सा’ नाही, असेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले. 

श्वेताच्या छळवणुकीला कंटाळून तिच्या वडिलांनी लवादाकडे तक्रार केली होती. तसेच श्वेताने आपल्या घरात राहावे अशी आपली अजिबात इच्छा नसल्याचेही स्पष्ट केले होते. श्वेता ही २०१५ पासून वडिलांसोबत राहात आहे आणि तेव्हापासूनच ती मालमत्तेतील वाटय़ासाठी आपला छळ करत असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केला होता.  वडिलांचे घर सोडण्याचे आदेश देण्याचा लवादाला अधिकार नसल्याचा दावा श्वेताच्या वतीने करण्यात आला होता. तर ज्या मालमत्तेत श्वेता वाटा मागत आहे ती तिच्या वडिलांनी स्वत: खरेदी केली आहे. ते त्या मालमत्तेचे मालक असल्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच असल्याचा दावा श्वेताच्या वडिलांतर्फे करण्यात आला.

न्यायालयाने काय म्हटले?

मुंबईतील आजवरच्या अनुभवावरून या शहरातील श्रीमंतांमध्ये, ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध पालकांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात मुलांच्या छळाला सामोरे जावे लागते. आमच्याकडे अशी प्रकरणे येत आहेत ज्यात मुलगा किंवा मुलींकडून छळवणूक होत असल्याच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिक करतात. बऱ्याचशा प्रकरणांत वृद्ध आई, वडिलांचा, त्यांच्या कल्याणाचा वा आनंदाचा जराही विचार न करता केवळ मालमत्ता हडपण्यासाठी मुलांकडून आई, वडिलांचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. आपल्यासमोर असलेले प्रकरणही काही वेगळे नाही. मुलगी श्वेता आपल्याला घरात नको असल्याचे ९५ वर्षांचे वडील वारंवार सांगत असतानाही ती त्यांच्यात घरात राहून मालमत्तेसाठी त्यांचा छळ करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bombay hc observes increase in harassment of elderly parents for property zws

ताज्या बातम्या