मुंबई : बेदरकारपणे वाहन चालवून भटक्या श्वानाच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याच्या आरोपाप्रकरणी २० वर्षांच्या विद्यार्थ्यांवरील फौजदारी कारवाई सुरू राहिल्यास त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीसह भवितव्यावर परिणाम होईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, त्याच्यावरील गुन्हा रद्द केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचिकाकर्ता २० वर्षांचा तरुण आहे आणि तो अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याची शैक्षणिक प्रगतीही चांगली आहे. या सगळ्यांचा विचार करता त्याच्याविरोधात गुन्हेगारी कारवाई सुरू राहिल्यास त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर व भविष्यावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले. तसेच, याचिकाकर्त्याला भटक्या श्वानांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेला पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>> मुंबई : व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये याचिकाकर्त्याने बोरिवली परिसरात वेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवून एका तात्पुरत्या शेडला धडकली. या अपघातात शेडमध्ये तयार केलेल्या मूर्तींचे नुकसान झाले, तर एका भटक्या श्वानाचाही मृत्यू झाला. त्यामुळे, याचिकाकर्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे, वैयक्तिक जीवन धोक्यात आणणारी कृत्य करणे या भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपण शेडचे नुकसान झाल्याबद्दल शेडच्या मालकाला आधीच दोन लाख रुपये दिले असून शेडच्या मालकानेही वाद सौहार्दपूर्णपणे सोडवल्याचे म्हटले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्याविरोधातील गुन्हा रद्द केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog mumbai print news zws
First published on: 25-01-2024 at 13:50 IST