मुंबई : मूळ गुन्हाच अस्तित्वात नसेल तर त्याआधारे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) नोंदवण्यात येणारी तक्रार (ईसीआयआर)कशी काय राहू शकते? असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी ईडीला विचारला. तसेच गुरुवापर्यंत या मुद्दयावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता यांनी त्यांच्याविरोधात ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायामूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानेही ईडीकडे याबाबत विचारणा केली. ईसीआयआर वैधानिक नव्हे, तर खासगी कागदपत्र आहे. त्यामुळे तो रद्द करता येऊ शकत नाही, असा दावा ईडीचे वकील हितेन वेणेगावकर आणि श्रीराम शिरसाट यांनी केला. ईसीआयआर आणि तपास यंत्रणेने नोंदवलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) तुलना होऊ शकत नाही, असेही वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयाने मात्र ईडीच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केला. ईडीच्या मते ईसीआयआरला काहीच महत्त्व नाही, ते एक साधे खासगी कागदपत्र आहे, तर ईडी ईसीआयआरच्या आधारे तपास कशी काय करू शकते, अशी विचारणा न्यायालयाने केली.