मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केलेल्या बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपांच्या प्रकरणातून सिद्धार्थ बांठिया याला दोषमुक्त करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या आरोपीने गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे नमूद करून न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.

न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या एकलपीठाने बंठियाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आले आहे. आपले आणि तक्रारदार अभिनेत्रीचे सहमतीने नाते होते. शिवाय तिच्यासोबतच्या लग्न हे चित्रिकरणाचा भाग होता, असा दावा याचिकाकर्त्यांने प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी करताना केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार तक्रारदार अभिनेत्री आणि आरोपीची २००८ मध्ये भेट झाली. त्यानंतर त्यांनी जुलै २०१० मध्ये लग्न केले. सप्टेंबर २०१० मध्ये एका महिलेने अभिनेत्रीला ती आरोपीची कायदेशीर पत्नी असल्याचे आणि त्यांना दोन मुले असल्याचे सांगितले. याबाबत अभिनेत्रीने आरोपीला विचारणा केली तेव्हा त्याने तिला घटस्फोटाची कागदपत्रे दाखवली. परंतु आरोपीने दाखवलेली घटस्फोटाची कागदपत्रे बनावट असल्याचे अभिनेत्रीला कळाले आणि २०१३  मध्ये तिने फसवणूक व बलात्काराच्या आरोपाखाली आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.