मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मंगळवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली. या वेळी न्यायालयाने मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांबाबत कोणतेही वक्तव्य करण्यापासून मज्जाव करणारा आदेश मात्र दिला नाही.

ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरोधात १.२५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तसेच मलिक यांना आमच्या कुटुंबाबद्दल, त्यातील सदस्यांबाबत प्रसारमाध्यमात वक्तव्य करण्यापासून, लिहिण्यापासून कायमस्वरूपी मज्जाव करण्याची मागणी वानखेडे यांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध झालेला मजकूर हटवण्याची मागणीही त्यांनी केली.

न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सोमवारी वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी मलिक यांच्या वतीने अ‍ॅड्. अतुल दामले यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. तसेच याचिकाकर्ते त्यांच्या सज्ञान मुलांच्या वतीने बोलू शकत नाही. इतरांच्या समाजमाध्यमावरील वक्तव्यासाठी मलिक यांना जबाबदार धरता येणार नसल्याचा दावाही केला. त्यावर न्यायालयाने मलिक यांना मंगळवापर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

भाजप नेते मोहित भारतीय यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी नवाब मलिक यांना कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिले. क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी मलिक यांनी  बदनामी केल्याचा आरोप भारतीय यांनी केला आहे. तक्रारदाराने सादर के लेला पुराव्यांचा विचार करता मलिक यांच्या विधानांमुळे तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचे दिसून येते आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० नुसार त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने मलिक यांना हजर राहण्याचे आदेश देताना स्पष्ट केले.

मलिक यांनी ९ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाची (एनसीबी) क्रूझवरील कारवाई ही बनावट असल्याचा आणि कारवाईमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. याच पत्रकार परिषदेत मलिक यांनी हेतुत: आपला आणि आपल्या मेहुण्याची बदनामी करणारी वक्तव्ये केली. कुठलाही पुरावा नसताना मलिक यांनी बदनामी केल्याचा दावाही भारतीय यांनी केला होता.