मुंबई : गणेशोत्सवासह सर्वधर्मीय उत्सवांत आणि मिरवणुकांतील ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांसह रस्त्यांवर फटाक्यांवर, तसेच डीजे, लेझर लाईट्स व बीम्सच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मिरवणुकांमध्ये ध्वनीची मर्यादा ओलांडणार्‍यांवर कारवाई म्हणून त्यांची उपकरणे, वाद्ये जप्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने प्रामुख्याने दिले.

शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवसासाठीही हे आदेश लागू असणार आहेत. या आदेशांशिवाय यापुढे उत्सव काळात ध्वनिक्षेपक वापरास परवानगी देताना मंडळांकडून एक लाख रुपयांची सुरक्षा ठेव म्हणून घेण्याचे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम जप्त करण्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले. प्रदूषणाची गंभीर समस्या होत असल्याची स्वत: दखल घेऊन दिलेला हा आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू असेल हेही न्यायालयाने अधोरेखीत केले.

‘गोंगाटाला सरकारची वृत्ती जबाबदार’

ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणा गांभीर्य दाखवत नाहीत, नागरिकांना उत्सवकाळात ध्वनी आणि हवा प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. मात्र सरकार ‘सर्व काही ठीक चालले आहे’ असा आभास निर्माण करते, अशी टीका उच्च न्यायालयाने आपल्या सविस्तर आदेशात केली आहे.  ध्वनी व वायू प्रदूषण न करताही सण साजरे केले जाऊ शकतात. किंबहुना, मिरवणुका आणि उत्सव अधिक सन्मानजनक व सभ्य पद्धतीने आयोजित करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.