मुंबई : ठाणे येथील दफनभूमीसाठी राखीव असलेल्या ३७ हजार चौरस मीटर भूखंडावर अतिक्रमण करून तेथे बहुमजली निवासी इमारत बांधल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आला आहे. सरनाईक यांच्यावरील आरोपांबाबत सुधारित याचिका करण्यास आणि त्यात खुद्द सरनाईक किंवा त्यांच्या विहंग समूहाला प्रतिवादी करण्यास उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सोमवारी परवानगी दिली. तसेच प्रतिवादींना गरज वाटल्यास त्यांनी या सुधारित याचिकेवर तीन आठवडय़ांत उत्तर दाखल करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चचे रहिवासी मेलविन फर्नाडिस यांनी ही जनहित याचिका केली असून न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सोमवारी सुनावणीसाठी आली. त्या वेळी ख्रिस्ती धर्मीयांच्या दफनभूमीसाठी राखीव जागेची पाहणी केली असता तेथे एक बहुमजली इमारत बांधल्याचे आढळून आले.

चौकशी केली असता सरनाईक यांनी या जागेवर अतिक्रमण करून तेथे इमारत बांधल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र याचिकेत याबाबत काहीच नमूद केलेले नाही. सरनाईक यांनाही प्रतिवादी केले नसल्याचे सांगण्यात आल्यावर सरनाईक यांना प्रतिवादी का केले नाही, असा प्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. तसेच आधीच्या सुनावणीच्या वेळी विहंग समूहाला प्रतिवादी करण्याची मुभा मागण्यात आल्याकडेही लक्ष वेधले. त्यावर अशा नावाची कंपनी नसल्याचे आणि याचिकेत कंपनीविरोधात काहीच आरोप करण्यात आलेले नाहीत हे दाखवून देण्यात आले. त्यानंतर याचिकाकर्त्यांने सुधारित याचिका करण्यास आणि याचिकेत सरनाईक यांना प्रतिवादी करण्याची मागणी केली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुधारित याचिका करण्यास सांगून त्यात सरनाईक किंवा त्यांच्या कंपनीला प्रतिवादी करण्याचे तसेच याचिकेची प्रत उपलब्ध करून देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.