मुंबई : ठाणे कासारवडवली येथे २०१३ मध्ये तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्याला विशेष न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली. दोषीने केलेला गुन्हा हा भयंकर आणि माणुसकीला काळिमा फासणारा असून त्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित केला असल्याचेही न्यायालयाने म्हटले. 

विशेष न्यायालयाने आरोपी रामकिरत गौड याला बलात्कार आणि खुनाच्या आरोपात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. दोषी हा रानटी वृत्तीचा आणि मानवी सद्सद्विवेकबुद्धीच्या विसंगत त्याचे वागणे आहे. त्यामुळेच त्याने केलेला गुन्हा हा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ या श्रेणीत येतो, असेही न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गौड याच्या फाशीवर शिक्कामोर्तब करताना नमूद केले. कुत्र्यासोबत खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीबाबत मनात वासनेची भावना उत्तेजित झाल्याचे दोन मुली आणि एका मुलाचा बाप असलेल्या दोषीचे सांगणे अनाकलनीय आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

आरोपीच्या कृत्यातून त्याची विकृत मनोवृत्ती स्पष्ट होते. आरोपीशी वैयक्तिकरीत्या बोलणे झाले त्यावेळीही त्याला त्याने केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चात्ताप नसल्याचे दिसून आले, असेही न्यायालयाने नमूद केले. दोषी हा मृत मुलगी राहत असलेल्या परिसरातच सुरक्षारक्षकाचे काम करत होता. घराजवळ ३० सप्टेंबर २०१३ रोजी खेळत असलेल्या चिमुरडीला गौडने जवळच्या संक्रमण शिबिरामध्ये नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला होता आणि नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या परिसरातील एका खंदकात लपवला होता.

स्थानिक पोलिसांनी त्याला ३० ऑक्टोबर २०१३ रोजी अटक केली आणि नंतर त्याच्याविरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ( पॉक्सो)  खटला चालवण्यात आला. मार्च २०१९मध्ये विशेष न्यायालयाने गौडला बलात्कार आणि खुनाच्या आरोपांत   दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याची ही फाशी    कायम राहावी यासाठी राज्य   सरकारने सरकारी वकील मानकुंवर   देशमुख यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली होती.

न्यायालय म्हणाले..

दोषीचे अमानवी कृत्य पाहता, त्याने मृत मुलीच्या मौल्यवान जीवनाचा क्षणभरही विचार केला नसल्याचे उघड आहे. आपल्यालाही दोन अल्पवयीन मुली आहेत हे दोषीला कृत्य करताना जराही स्मरले नाही. अशा घटनांमुळे प्रत्येक लहान मुलीच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार होते. जीवनाचे विविध रंग अनुभवण्याआधीच त्यांची निष्पाप, अल्पवयीन मुलगी एका विकृत वृत्तीच्या व्यक्तीच्या वासनेला बळी पडेल याची मृत मुलीच्या पालकांनी कल्पनाही केली नसेल