भांडणानंतर संतापाच्या भरात डॉक्टर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या डॉक्टरला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेवर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले.
गुरुदत्त ऊर्फ जन्मेजयकुमार शंकर गावडे असे या डॉक्टरचे नाव आहे.  डॉक्टरी नीट चालत नसल्याने माहेरहून पैसे आणण्याचा तगादा तो पुष्पाकडे लावत होता. तिने वेळोवेळी ती मागणी फेटाळली. गावडे पिढीजात जमिनीच्या वाटणीसाठीही  भावाच्याही मागे लागला होता. त्यालाही पुष्पाचा विरोध होता. या सगळ्यामुळेच तो सतत भांडायचा. ६ नोव्हेंबर २००१ च्या मध्यरात्री त्याने पुष्पाशी कडाक्याचे भांडण केल्यानंतर तिच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव करून तिची हत्या केली. मुलालाही पाण्याच्या टाकीत बुडवून त्याने मारले. नंतर तो मित्राच्या गावी पसार झाला. मात्र ज्याच्याकडून त्याने जागा भाडय़ाने घेतली होती त्याला आवाज बदलून, गावडेंच्या घरात दोन हत्या झाल्याचे त्याने कळविले. घरमालकाने गावडेचा आवाज ओळखला आणि पोलिसांना कळविले होते.
सांगली सत्र न्यायालयाने २००३ मध्ये डॉ. गावडेला जन्मठेप ठोठावली. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. विजया कापसे-ताहिलरामानी आणि न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने मात्र सांगली न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले.