मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संबंधित बातम्यांचे वार्तांकन करताना वापरली जाणारी आक्रमक भाषा सौम्य करण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने मंगळवारी ”रिपब्लिक टीव्ही” आणि वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिला.
अंबानी यांनी ”रिपब्लिक टीव्ही” आणि गोस्वामी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन मानहानीचा दावा दाखल केला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठापुढे मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालय प्रतिवाद्यांना अंबानी यांच्याबाबत वार्तांकन करण्यापासून वाहिनीला रोखणार नाही, परंतु त्यांनी अवमानकारक भाषेचा वापर करू नये. अन्यथा, तसा आदेश दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले
प्रतिवादी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र, कोणत्याही अवमानकारक विशेषणांचा वापर केला जाऊ नये, असे निरीक्षणही एकलपीठाने नोंदवले. वार्तांकनाच्या आशयावर प्रश्न उपस्थित केला जात नसला, तरी प्रसारणादरम्यान वापरली जाणारी भाषा आणि सूर मात्र आक्षेपार्ह आहे. कायदेशीर तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. त्यांना ते करू द्या. अनैतिक किंवा अनुचित हल्ला करणे योग्य नाही, असेही न्यायालयाने रिपब्लिक टीव्ही” आणि गोस्वामी यांना सांगितले.
अंबानी यांच्या याचिकेनुसार, त्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी ”रिपब्लिक टीव्ही”ने प्रसारित केलेल्या बातम्यांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे, एआरजी आउटलायर मीडिया प्रा. लि., गोस्वामी आणि इतर काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध तात्पुरता मनाई हुकूम काढावा, अशी मागणी अंबानी यांनी केली. वाहिनी आणि गोस्वामी यांचे वार्तांकन म्हणजे आपल्याविरुद्ध चालवलेले बदनामीचे षङयंत्र आहे, असा युक्तिवाद करताना त्याच्या समर्थनार्थ अंबानी यांच्या वतीने काही साहित्य न्यायालयात सादर केले गेले. दुसरीकडे, ”रिपब्लिक टीव्ही” आणि गोस्वामी यांचे वार्तांकन निष्पक्ष असल्याचा दावा करून, सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली.
त्यावर प्रतिवाद्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांनी वापरलेला प्रत्येक शब्द योग्य आणि निष्पक्ष असल्याचे नमूद करावे, असे न्यायालयाने म्हटले. परंतु प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईपर्यंत वाहिनी किंवा गोस्वामी यांनी अंबानी यांच्याबद्दल आक्षेपार्ह किंवा अवमानकारक शब्दांचा वापर करणे टाळावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
