मुंबई : बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यातंर्गत (पोक्सो) लैंगिक अत्याचार पीडित मुलींना आधार देण्यासाठी राज्य सरकारकडे विशिष्ट योजना आहे का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, राज्य सरकारला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तथापि, अशी योजना सरकारकडे नसल्यास, न्यायालय त्याबाबत योग्य तो आदेश पारित करेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

केवळ आर्थिक मदत या पीडित मुलींना दीर्घकाळात स्वावलंबी करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही, असेही न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. अशा पीडितांसाठी एका वेगळ्या दृष्टिकोनाची गरज असल्याचेही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने नमूद केले. कायद्यांतर्गत येणाऱ्या पीडितांचे शिक्षण आणि भविष्यातील उपजीविका सुनिश्चित करण्यासोबतच, त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने त्यांना मानसिक आघातातून बाहेर पडण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणे गरजेचे आहे यावर देखील न्यायालयाने भर दिला.

पोक्सो कायद्यांतर्गत पीडित मुलींशी संबंधित तीन याचिकांवर सुनावणी झाली. त्यावेळी महिला व बालविकास विभागाने काढलेला शासननिर्णय (जीआर) सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सादर केला. या निर्णयामध्ये ”बाल न्याय कायदा, २०१५” आणि ”२०१८ चे नियम” यांच्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या एका योजनेची रूपरेषा मांडण्यात आली होती. ही योजना काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या विविध श्रेणींमधील मुलांना लागू होते. त्यात पोक्सोंतर्गत गुन्ह्यांच्या शिकार झालेल्या मुलांचाही समावेश आहे. तथापि, पीडितांना मदत करण्यासाठी कोणतीही विद्यमान योजना नसेल, तर न्यायालय त्याबाबत योग्य तो आदेश पारित करेल, असेही न्यायालयाने सरकारला बजावले.