मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ””वंदे भारत”” सारख्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये थांबे जाहीर करणारी उद्घोषणा प्रणाली सुरू करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केली आहे. गंतव्य स्थानकावर गाडी न थाबल्यास प्रवाशांकडून घाबरलेल्या स्थितीत धावत्या गाडीत चढणे-उतरणे टाळण्याच्या दृष्टीने न्यायालयाने ही सूचना केली.

गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे याचा स्पष्ट उल्लेख असलेली उद्घोषणा प्रणाली ””वंदे भारत””च्या सर्व गाड्यांमध्ये सध्या अवलंबली जाते, त्या धर्तीवर लांब पल्ल्याच्या अन्य गाड्यांमध्येही या उद्घोषणा प्रणालीची अंमलबजावणी करावी, असेही न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने रेल्वे प्रशासनाला उपरोक्त सूचना करताना नमूद केले. तसेच, दहा वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या एका याचिकाकर्त्याला ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

लोकल गाड्यांमध्ये, गाडी काही विशिष्ट स्थानकांवर थांबणार नाही किंवा थांबणार आहे हे दर्शवणारा फलक किंवा उद्घोषणा प्रणाली उपलब्ध असते. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या बाबतीत मात्र फलाटांवर अशा प्रकारचा फलक किंवा उद्घोषणा प्रणाली दिसून येत नाही. लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वापर प्रवासी एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकापर्यंतचा कमी अंतराचा प्रवास करण्यासाठीही करतात, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच, गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार नाही याविषयी कोणतीही घोषणा केली गेली जात नसेल, तर ज्या स्थानकावर गाडी थांबत नाही, तिथे गाडीत चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या प्रवाशाला पूर्णपणे दोषी धरता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी, रेल्वे प्रशासनाने ””वंदे भारत”” गाड्यांच्या धर्तीवर सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू करण्याचे न्यायालयाने म्हटले.

रोहिदास कुमावत यांनी जानेवारी २०१८ मध्ये रेल्वे दावा न्यायाधिकरणाने भरपाई नाकारण्याच्या आदेशाला आव्हान दिले होते. कुमावत हे गुवाहाटी एक्स्प्रेसने मनमाडहून जळगावच्या दिशेने प्रवास करत होते. गाडी जळगाव स्थानकावर पोहोचत असताना गर्दीमुळे कुमावत यांचा हात निसटला आणि ते गाडीतून खाली पडले; यात त्यांच्या डोक्याला आणि पायांना दुखापत झाली. परंतु, कुमावत यांना अनपेक्षित घटनेमुळे दुखापत झालेली नाही. तर ती त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेल्या स्थितीमुळे झाली आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायाधिकरणाने कुमावर यांचा भरपाईचा दावा फेटाळला होता. कुमावत हे डब्याच्या दरवाजाजवळ बसले असल्यामुळे खाली पडले. गाडी जळगाव स्थानकाकडे येत असताना, ती तिथे थांबणार नाही हे लक्षात आल्यावर, गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच ते खाली पडले, असेही न्यायाधिकरणाने कुमावत यांना दिलासा नाकारताना नमूद केले होते.

न्यायालयाने मात्र न्यायाधिकरणाचा हा निष्कर्ष फेटाळला. तसेच, कुमावत हे वैध तिकिटावर प्रवास करत होते. त्याचप्रमाणे, जळगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने, सर्व गाड्या तिथे थांबतात या समजुतीनेच ते गाडीत चढले होते. तथापि, गाडी जळगावला थांबली नाही हे लक्षात आल्यावर, त्यांनी धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, एखादी व्यक्ती धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिला काहीतरी दुखापत होणे हे अगदी स्वाभाविक आहे, असे न्यायालयाने म्हटले. अपीलकर्त्यानेही गाडीतून उतरण्यासाठी पुढच्या स्थानकापर्यंत वाट पाहिली असती. परंतु अशा प्रसंगी एखादी व्यक्ती आपला मानसिक समतोल गमावून बसते आणि घाबरलेल्या अवस्थेत आणि स्वतःला दुखापत करून घेण्याचा कोणताही हेतू नसतानाही, ती गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्याला मुद्दाहून केलेले कृत्य म्हणता येणार नाही, असे स्पष्ट करून न्यायमूर्ती जैन यांनी कुमावत यांच्या बाजून निर्णय दिला.