मुंबई : दिवाळीत कोणत्याही वेळी आणि कुठेही फटाके वाजवून ध्वनी व हवा प्रदूषण करू नये, असे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री आणि पर्यावरणीय कार्यकर्त्या दिया मिर्झा यांच्या महापालिकेच्या समाजमाध्यामावरून प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीवरून केल्या जात असलेल्या राजकारणावर उच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्यांचे नाव न घेता संताप व्यक्त केला. तसेच, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सार्वजनिक हितासाठी पुढे येणाऱ्या सेलिब्रेटींच्या निवडीला राजकीय नेत्यांकडून जातीय रंग दिला जाणे आणि त्यावरून राजकारण करणे हे दुर्दैवी आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध असल्याचे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. त्याचवेळी, कोणत्याही व्यक्तीला सण साजरा करण्यापासून वेगळे ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करून दिया यांची हटवण्यात आलेली चित्रफित पुन्हा प्रसारित करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मिर्झा यांच्याबाबत घेतलेला निर्णय योग्य असून त्यात काहीही चुकीचे नाही. किंबहुना, त्यांनी हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला असून तो कायद्याच्या चौकटीतच आहे. त्यामुळे, आयुक्तांच्या आदेशाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही आणि त्याला जातीय रंग देऊन त्यावरून राजकारण करू शकत नाही. तथापि, भाजप नेत्यांच्या आक्षेपानंतर आणि त्यांनी मिर्झा यांना हिंदूविरोधी ठरवल्यानंतर, सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्याबाबत न्यायालयाच्या आदेशांविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या विनंतीवरून दिया यांनी प्रसिद्ध केलेली चित्रफित महापालिकेच्या समाजमाध्यमावरून काढून टाकण्यात आली. ती महापालिकेने काढायला नको होती, असे नमूद करून हे सगळे धक्कादायक असल्याचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने सुनावले. लोकप्रतिनिधींबाबत आम्हाला आदर आहे. मात्र, मिर्झा यांच्यावरून जे राजकारण झाले ते दुर्देवी असल्याचा पुनरूच्चार न्यायालयाने केला.

राजकीय नेत्यांनी न्यायालयाच्या आधीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून या टिप्पण्या केल्या आहेत. या आदेशाने सर्वांना या जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे, महापालिका आणि मिर्झा यांनी न्यायालयाच्या आदेशांनुसारच काम केले आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. काही नगरसेवक आणि राजकीय नेत्यांचा दृष्टिकोन चुकीचा आहे आणि त्यांनी या विषयाला कोणताही रंग देऊ नये. असेही न्यायालयाने बजावले. हा पूर्णपणे पर्यावरणाशी संबंधित विषय आहे आणि त्याला इतर कोणताही रंग देऊ नये. प्रत्येकजण एकाच हवेत श्वास घेत आहेत, मग ती व्यक्ती कोणीही असो, असे न्यायालयाने मिर्झा यांची फटाके वाजवण्याबाबत जनजागृती करणारी चित्रफित पुन्हा प्रसारित करण्याचे आदेश महापालिकेला देताना स्पष्ट केले. आमची सर्वोच्च प्राथमिकता पर्यावरण आहे.

त्यामुळे, जेव्हा ‘आम्ही’ असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ ‘जनता’ असा होतो आणि त्यात सर्व जाती, पंथ आणि धर्मांचे जागरूक नागरिक समाविष्ट असतात, असे न्यायालयाने म्हटले. एखादी व्यक्ती समाजाबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी पुढे येते आणि आपला वेळ देते, तेव्हा तुम्ही संकुचित वृत्तीने त्या व्यक्तीलाच फटकारता ? जात, पंथ किंवा धर्माचा विचार न करता, आपण आरोग्य आणि पर्यावरणाबद्दल बोलत असतो, तेव्हा तिथे वैयक्तिक स्वार्थाचा किंवा संकुचित विचारांचा प्रश्नच उद््भवत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

कुठे चाललो आहोत आपण ?

राजकीय दबावानंतर मिर्झा यांची चित्रफित हटवल्याबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून जनजागृती करणाऱ्या एखाद्या व्यक्तिला विरोध कसा केला जाऊ शकतो ? असा संतप्त प्रश्न देखील न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. तसेच, अशा प्रकारे या मुद्याचे राजकारण करून आदेशाचे पालन करणाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करू नका. लोकप्रतिनिधींकडून हे अपेक्षित नाही. आपण नेमके कुठे चाललो आहोत, असे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. त्याचप्रमाणे जे घडले ते घडायला नको होते, असे नमूद करून मिर्झा यांची चित्रफित पुन्हा प्रसारित करा आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा संपादित करा, असे आदेश न्यायालयाने दिले.

बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेत्यांकडून जनजागृती नाहीमुंबईसारखे शहर एकजुटीवर आणि समाजाप्रती असलेल्या दृढ भावनेवर टिकून आहे. अशा परिस्थितीत, काही “बेजबाबदार विधानांमुळे” ही एकता विस्कळीत होऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. राजकीय नेत्यांनी किंवा व्यक्तींनी सोमवारी बेजबाबदार टिप्पणी केल्या, त्यांनी स्वतः जनजागृती करणारी कोणतीही चित्रफित प्रसारित केल्याचे आम्हाला दिसले नाही. आपण एक धर्मनिरपेक्ष देश आहोत. या प्रकारामुळे आम्हाला मनापासून दु:ख झाले आहे. सार्वजनिक पदांवर असलेल्या व्यक्तींकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही, असेही न्यायालयाने सुनावले.