Bombay High Court Orders Ban on DJ, Firecrackers and Lasers: भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत ध्वनी प्रदूषणावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सण-उत्सव, मिरवणुका आणि राजकीय सभांमध्ये होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने सातत्याने कठोर ओढले आहेत. ध्वनी प्रदूषण हे नागरिकांच्या शांततेने जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असेही न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले. परंतु, न्यायालयांचे आदेश, कायद्यातील तरतुदी याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली सुरूच ठेवली गेली. किंबहुना, प्रत्येक वेळी नव्या पळवाटा शोधून आदेश-नियम धाब्यावर बसवण्यास सूट दिली गेली. शांतता क्षेत्रांतील गोंगाटाबाबत न्यायालयाने बडगा उगारताच ती रद्द करण्याचा धाडसी निर्णय राज्य सरकारने घेतला. यावरून न्यायालय आणि सरकार असा वादही रंगला आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील विद्यानंद बापट यांनी उत्सवांतील गोंगाटाविरोधात दंड थोपटले आणि हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने उत्सवांतील गोंगाटाची गंभीर दखल घेतली आणि एवढ्यावरच न थांबता स्वत: हून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याच्या महाधिवक्त्यांसह सर्व प्रतिवाद्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. महाधिवक्त्यांना तर गेल्या वर्षीच्या उल्लंघनकर्त्यांवरील कारवाईच्या तपशीलासह आणि दणदणाट कसा रोखणार याबाबतच्या उपाययोजनांसह उपस्थित राहण्यास सांगितले गेले. मंगळवारी दिवसभर या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने रस्त्यांवर फटाके वाजवण्यास पूर्ण बंदी घालण्याच्या ऐतिहासिक आदेशासह, यापुढे उत्सवकाळात ध्वनीची पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आदेश दिले. तथापि, न्यायालयाच्या या ऐतिहासिक आदेशाने उत्सवांतील गोंगाट थांबणार की पहिले पाढे पंचावन्न अशी या आदेशांची स्थिती होईल हा प्रश्न आहे.
ध्वनी प्रदूषणाबाबतचे प्रमुख कायदेशीर नियम आणि आदेश
वास्तविक, २००५ पासून ध्वनी प्रदूषषणाचा मुद्दा न्यायालयात चर्चिला जात आहे. न्यायालयाने वेळोवेळी विविध प्रकारचे विशेषकरून उत्सवांतील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक आदेश दिले आहेत. आतापर्यंतचे ध्वनी प्रदूणाचे नियम पाहिले, तर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक किंवा मोठ्या आवाजाच्या यंत्रणा वापरण्यास पूर्ण बंदी आहे. केवळ काही विशेष सणांच्या दिवशी राज्य सरकार ही मर्यादा रात्री १२ वाजेपर्यंत शिथिल करू शकते. याशिवाय, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटरच्या परिघात कोणत्याही आवाजाला परवानगी नाही. परंतु, शांतता क्षेत्रच सरकारने एका निर्णयाद्वारे मोडीत काढल्याने या नियमांचे पालन केले जात नाही. याउलट, उत्सवांच्या सगळ्याच दिवसांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. पोलीसही त्याबाबत काहीच कारवाई करत नाही हा अनुभव सर्वत्र आहे.
ताज्या आदेशाचे वेगळेपण
सण-उत्सव हे आनंद मिळवण्यासाठी, एकोपा वाढवण्यासाठी साजरे केले जातात. परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्सवांचे पांरंपरिक स्वरूप बदलून त्याचे धांगटधिंग्यात रुपांतर झाले आहे. कोणत्याही प्रहरी ध्वनिक्षेपकावरून मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, कर्णकर्कश वाद्यांचा सर्रास वापर करून संपूर्ण परिसर दणाणून सोडणे, फटाक्यांची आतषबाजी करून नियमांची अक्षरश: नियमांची पायमल्ली केली जात आहे. नियम अस्तित्त्वात नसल्यासारखे सगळे सुरू आहे. आपल्या आधीही हा दणदणाट रोखण्यासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने कठोर आदेश पारित केले आहेत आणि त्यांनाही केराची टोपली दाखवली जात असल्याचे माहीत असूनही न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठाने या समस्येची दखल घेऊन स्वत:हून जनहित याचिका दाखल केली.
यापूर्वीच्या आदेशांचे काय झाले आणि होत आहे हे सध्याच्या उत्सवांत दिसत असल्याचे खंडपीठाने सुनावणीच्या वेळी वारंवार बोलून दाखवले. परंतु, असे असले तरी आता खूप झाले असून हे कुठेतरी थांबायला हवे आणि त्यासाठी कठोर आदेश देण्याची गरज असल्याचे खंडपीठाने नमूद केले. आतापर्यंत रस्त्यांवर फटाके वाजवण्यावर बंदी नव्हती. शिवाय, ध्वनिक्षेपकासाठी परवानगी मागताना अनामत रक्कम जमा करण्याची आणि उल्लंघनानंतर ती जप्त करण्याची तरतूद नव्हती. न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात रस्त्यांवर आतषबाजी करण्यास, डीजे, लेझर बीम्स आणि लाईटचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी केली. तसेच ध्वनिक्षेपकास परवानगी हवी असल्यास मंडळाच्या पातळीवर एक लाख वैयक्तिक पातळीवर ५० हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करण्याचे आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारच्या सारवासारवीच्या भूमिकेनंतर निर्णय
मुंबईत आधीच वाहतूक कोंडीसह विविध प्रकारच्या प्रदूषणाच्या समस्या आहेत. त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हवा प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा ढासळतो. वातावरणात धूळीचे साम्राज्य असते. त्यात उत्सवकाळांतील ध्वनी आणि हवा प्रदूषणाने भर पडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. आम्हाला मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता असून सार्वजनिक रस्त्यांवर फटाके वाजवण्यास बंदी घालणार का, रात्री दहानंतर फटाके किंवा ध्वनीक्षेपक वाजवण्यावर बंदी घालणार का, अशी विचारणा न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती गोखले यांनी सुनावणीदरम्यान केली होती व सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. तथापि, नियमांची योग्य आणि कठोर पद्धतीने पालन केले जात आहे. तसेच, काही ना काही त्रुटी राहणारच. त्यात पोलीस दलाच्या कमी मनुष्यबळाचा दाखला महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी दिला व ध्वनी व हवा प्रदूषण नियम व आदेशांच्या अंमलबजावणीबाबत सर्व काही ठीक सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारच्या सर्व काही ठीक असल्याचे आभासी चित्र रंगवण्याच्या प्रयत्नाशी न्यायालयाने असहमती दर्शवली व कठोर आदेश दिले.
मोजक्यांचा हा उच्छाद थांबालाच पाहिजे
आपण सण- उत्सव आनंद, शांती मिळावी म्हणून साजरे करतो, पण उतस्वांच्या दिवसांत याउलट चित्र दिसते. सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव साजरे करणाऱ्यांची संख्या हातावर मोजण्याएवढी आहे. मात्र, याच हाताच्या बोटांवर मोजणाऱ्यांमुळे ध्वनी, वायू प्रदूषण होऊन लाखो सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येतो, त्यांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. हे कुठे तरी थांबायला हवे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. खरा उत्सव आणि दणदणाट यामधील फरक विशद करण्यासाठी न्यायालयाने पंढरीच्या वारीचे उदाहरण दिले. या वारीत लाखो भाविक सहभागी होतात आणि टाळ आणि मृदुंगाच्या वातावरणात ही वारी पुढे सरकत जाते. पण तिथे कुठल्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण अनुभवायला मिळत नाही. याउलट, मुंबईत उत्सवकाळात सर्वत्र कर्णकर्कश वाद्ये वाजवली जातात. ध्वनिक्षेपकावरून मोठ्या आवाजात संगीत लावले जाते. रस्त्यांवर कसलीही तमा न बाळगता फटाके वाजवले जातात. त्यामुळे होणाऱ्या आवाजामुळे अपघात होतात. आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो याचा कोणीच विचार करत नाही. पण आता तो व्हायलाच हवा, असेही न्यायालयाने या सगळ्यांना बंदी घालण्याचे आदेश देताना नमूद केले.
यत्रंणा आणि आयोजकांच्या वृत्तीला चपराक
सर्व सामान्यांना त्रास, मनस्ताप द्या आणि काही नुकसान झाल्यावर पाच हजार रुपये दंड आकारून जप्त केलेली वाद्ये परत करा हेच कारवाईच्या नावाखाली आतापर्यंत चालत आले आहे. पण हे खपवून घेऊ शकत नाही. याच कारणांमुळे उत्सवांच्या काळात आवाजाच्या पातळीवर कायद्याने कोणतेही बंधन नाही अशी धारणा झाल्याचे चित्र दिसते, अशी टिप्पणी करून न्यायालयाने उत्सव, विविध प्रकारच्या मिरवणुकांसाठी ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देताना मंडळांकडून एक लाख, तर वैयक्तिक पातळीवर ५० हजार रुपयांची अनामत रक्कम घेण्याचे आदेश दिले. शिवाय, संबंधितांकडून ध्वनी नियमांचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम जप्त करण्याचे बजावले आहे.
आदेशांकडे दुर्लक्ष दुर्दैवी
ध्वनिप्रदूणाची पातळी नियंत्रित व नियमन करण्यासाठी कायद्यात ठोस तरतुदी आहेत. न्यायालयानेही वळोवेळी यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यातील बहुतांश केववळ कागदावरच आहेत. त्यांची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी होतच नाही. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्य प्राधकरणांच्या यंत्रणांमार्फत त्याबाबत ठोस उपाययोजना किंवा कारवाईच केली जात नाही. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या याबाबतच्या आदेशांकडेही दुर्लक्षच केले जात असल्याचे वस्त्तुस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरावरील अधिकारी या…. वास्तवापासून पळ काढू शकत नाहीत. या उदासीनतेचा फटका निष्पाप, निपराध सर्वसामान्यांना बसत आहे. त्यांच्यावर ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास लादला जात असून त्यांचे आरोग्य धोक्यात घातले जात आहे, असा संताप रस्त्यांवर फटाके वाजवण्यास बंदी घालताना आणि ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देताना न्यायालयाने व्यक्त केला.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या सक्रियतेवर प्रश्न
आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उत्सवकाळातील ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे आदेश काढले आहेत. पोलीस आयुक्त या नात्याने त्यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून डीजे, डॉल्बी, लेझर, डीम लाईटवर बंदी घातली असून त्याची कठोर अंमलबजावणी करत आहे. असे असताना मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना असे आदेश काढणे का शक्य नाही ? तेच आदेश मुंबईत का लागू करत नाहीत ? नागपूरचे पोलीस आयुक्त इतके सक्रिय आहेत, मग मुंबईचे पोलीस आयुक्त मागे का ? असा प्रश्नही न्यायालयाने केला.
उत्सवी गोंगाटाला कात्री लावणाऱ्या आदेशात काय ?
- सण-उत्सवादरम्यान सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या जागांवर फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी.
- मिरवणुकांमध्ये अतितीव्रतेचे लेझर लाईट्स आणि ल्युमेन बीम लाईट्स वापरण्यावर पूर्ण बंदी.
- परवानगी दिलेल्या साऊंड सिस्टीमची डेसिबल (आवाजाची तीव्रता) पातळी तपासण्याचे पोलिसांना आदेश.
- नियमांचे उल्लंघन आढळल्यास पोलिसांनी संबंधित ध्वनियंत्रणा तात्काळ जप्त करावी.
- परवानगी मागणाऱ्या मंडळांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना दिसेल असा ‘डेसिबल मीटर’ लावावा आणि साऊंड सिस्टीममध्ये अंतर्गत ‘साऊंड लिमिटर’ बसवणे अनिवार्य.
- नियुक्त अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आवाजाची डेसिबल पातळी नोंदवून त्याची नोंद ठेवावी.
- मंडळांनी पोलिसांची परवानगी, जबाबदार व्यक्तीचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक दर्शवणारा फलक मंडपात किंवा मिरवणुकीत लावणे बंधनकारक.
- मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी आयोजकांना नियमांची जाणीव करून द्यावी.
- एकाच प्रभागात अनेक मंडळांना परवानगी देताना त्याचा एकूण ध्वनी प्रदूषणावर काय परिणाम होईल, याचा शास्त्रीय अभ्यास करूनच परवानगी द्यावी.
