प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुटकेला विलंब ; आर्यनला १४ अटींवर जामीन

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना १४ अटी घातल्या आहेत.

मुंबई : आर्यन खानला जामीन मंजूर केल्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यानंतरही जामिनाची पुढील प्रक्रिया शुक्रवारी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्याची आज, शनिवारी सुटका होणार आहे.

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना १४ अटी घातल्या आहेत. त्यात विशेष न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याचा, भविष्यात असाच गुन्हा केल्यास तात्काळ जामीन रद्द करण्याचा तसेच अपरिहार्य कारण असल्याचा प्रसंग वगळता खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याच्या अटींचा प्रामुख्याने समावेश आहे.

दरम्यान, प्रत्येकी एक लाख रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र आणि तेवढय़ाच रकमेचे एक किंवा अधिक हमीदार देण्याच्या अटीवर त्याची सुटका करण्यात येणार आहे. याशिवाय जामिनावर सुटका झाल्यानंतर आर्यन आणि अन्य दोन आरोपींना विशेष न्यायालयात पारपत्र जमा करण्यासह प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

सुटका का लांबली?

 सायंकाळी साडेपाचपर्यंत आर्थर रोड कारागृहाची शेवटची जामिनाची पेटी उघडते. त्या वेळेत जामीन मंजूर केल्याचा न्यायालयाचा आदेश आला असल्यास त्या दिवशी संबंधित आरोपीची सुटका करण्यात येते. मात्र आर्यनला जामीन मंजूर केल्याची न्यायालयाच्या आदेशाची प्रत कारागृहाच्या वेळेत न पोहोचल्यामुळे त्याची शुक्रवारी सुटका होऊ शकली नाही.

अन्य अटी

* आर्यनला मुंबईबाहेर जायचे असल्यास एनसीबीच्या तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती द्यावी.

*  प्रवास आणि निवासाचा तपशील द्यावा लागेल. तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहावे.

*  खटल्यावर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही.

*  अशाच प्रकारच्या कृत्यात सहभागी होऊ नये वा सहभागी असलेल्यांशी संपर्क साधू नये. सहआरोपींच्याही संपर्कात राहू नये.

*  साक्षीदारांवर स्वत: किंवा कोणाच्याही माध्यमातून दबाव आणू नये आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.

*  खटल्याबाबत प्रसारमाध्यमांद्वारे वा समाजमाध्यमांतून वक्तव्य करू नये.

*  खटल्याची सुनावणी सुरू झाली तर ती लांबवण्याचा प्रयत्न करू नये.

जुही चावला हमीदार

आर्यनच्या जामिनावरील सुटकेसाठी उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचे बंधपत्र तसेच त्याच रकमेचा हमीदार सादर करण्याची अट घातली होती. आर्यनची हमीदार म्हणून अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी विशेष न्यायालयासमोर हजर झाली. न्यायालयाने तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्यास सांगितले. आर्यनचे वडील  शाहरुख खान आणि जुहीने चित्रपटांतून एकत्र काम केले असल्याने ती आर्यनला  ओळखत असल्याचे त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले.

राऊत यांचे क्रांती रेडकरला प्रत्युत्तर 

मुंबई : क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्याविषयी आम्हाला आपुलकी आहे. पण एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे मराठी नाहीत का, असा प्रश्न विचारत विषय मराठी-अमराठीचा नसून सत्य-असत्याचा आहे, असे उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गाऱ्हाणे मांडले होते.

पंच किरण गोसावीवर आणखी एक गुन्हा

पुणे : आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावीला फसवणुकीच्या गुन्हयात पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशिरा लष्कर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. गोसावीविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.  गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात तीन वर्षांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bombay high court granted aryan khan bail on 14 conditions zws

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !