मुंबई : मारहाणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम जामीन मंजूर केला. आरोपीच्या जुळ्या मुली त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असून, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांना त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे न्यायालयाने या आरोपीला जामीन मंजूर करताना प्रामुख्याने नमूद केले.
याचिकाकर्त्याच्या मुलींनी २०२६च्या जेईई मुख्य परीक्षेत उत्तम गुण मिळवले आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान होता कामा नये, असेही न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने आरोपीला दिलासा देताना स्पष्ट केले. शैक्षणिक कारकीर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या याचिकाकर्त्याच्या जुळ्या मुलींना, त्यांच्या स्वतः एक अभियंता असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.
या मुलींचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे आणि वडिलांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या कारकिर्दीत कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये यासाठी याचिकाकर्त्याला अंतरिम जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. याचिकाकर्ता पारस शहा याला मारहाणीच्या आरोपाखाली बोरिवली पोलिसांनी अटक केली होती. तो गेल्या २३ मार्चपासून कोठडीत आहे.
त्याच्या मुलींना जेईई मुख्य परीक्षेत अनुक्रमे ९९.८९ आणि ९९.६८ पर्सेंटाईल मिळाले आहेत. तसेच, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या जेईई अॅडव्हान्स, बीआयटी सॅट परीक्षांची त्या सध्या तयारी करत आहेत, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, त्यात त्यांना त्यांच्या वडिलांकडून आर्थिक पाठिंबा आणि करिअरविषयक मार्गदर्शन या दोन्ही गोष्टींची गरज असते. याचिकाकर्त्याच्या मुलींची शैक्षणिक कामगिरी अत्यंत उत्कृष्ट असूनही, याचिकाकाकर्त्याला अंतरिम जामीन नाकारला, तर त्याचा त्याच्या मुलींवर विपरीत परिणाम होईल, असेही याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
पीडित व्यक्तिला जामिनाला विरोध
याचिकाकर्त्याच्या जामिनाच्या मागणीला पीडित व्यक्तीच्या वतीने विरोध करण्यात आला. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. तसेच, या मारहाणीमुळे तक्रारदाराची दृष्टी गेली असून, त्यांना अनेक महिने रुग्णालयात दाखल राहावे लागले होते, असा दावाही पीडित व्यक्तीतर्फे करण्यात आला. अतिरिक्त सरकारी वकिलांनीही याचिकाकर्त्याच्या याचिकेला विरोध केला. परंतु, त्याला दिलासा देण्यात आल्यास कठोरी अटी लादण्याची मागणी करण्यात आली.
न्यायालयाचा आदेश
न्यायालयाने याचिकाकर्त्याला १६ ते २६ मे या कालावधीसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने याचिकाकर्त्याला मालाड पोलीस ठाण्यात दररोज उपस्थिती लावण्यासह त्याच्यावर अनेक अटीही घातल्या. तसेच, अंतरिम जामिनाच्या कालावधीत आरोपीने बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर राहावे आणि या काळात त्याच्यासह साध्या वेशातील एक पोलीस अधिकाऱी राहील, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
