आज किंवा उद्या तुरूंगाबाहेर

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. परंतु, जामिनाच्या अटींबाबतचा आदेश शुक्रवारी देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनची शुक्रवारी किंवा शनिवारी सुटका होऊ शकेल. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज र्मचट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला.

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांच्या याचिका मंजूर केल्या. जामीन मंजूर का करण्यात आला, याचा तपशीलवार आदेश शुक्रवारी सायंकाळपर्यंत देणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर रोख रकमेवर आर्यनची सुटका करण्याची विनंती रोहटगी यांनी केली. त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळली आणि हमीदारांच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचे नमूद केले.

गेल्या तीन दिवसांपासून आर्यन आणि अन्य दोन आरोपींच्या याचिकांवर न्यायमूर्ती सांब्रे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. आर्यनसह अन्य आरोपींच्या याचिकांना विरोध करणारा युक्तिवाद ‘एनसीबी’तर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी गुरुवारी केला. त्यानंतर रोहटगी हे युक्तिवाद करत असतानाच न्यायमूर्ती सांब्रे यांनी अचानक याचिकेची फाइल कर्मचाऱ्यांकडे सोपवून यचिका मान्य केल्या जात असल्याचे स्पष्ट केले.

महानगर दंडाधिकारी आणि विशेष सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यनसह अन्य दोन आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याला नकार देत सुनावणी २६ ऑक्टोबरला ठेवली होती.

 ‘अमली पदार्थ हस्तगत होणे योगायोग नाही

छाप्यानंतर ११ जणांपैकी आठ जणांना अटक झाली. आठही आरोपींकडून अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले असले तरी अमली पदार्थाच्या एकत्रित प्रमाणाचा विचार करता हा कट आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर ‘एनसीबी’तर्फे अनिल सिंह यांनी होकारार्थी उत्तर दिले.

आर्यनकडे अमली पदार्थ सापडले नसले तरी अरबाजसह प्रकरणातील इतर आठ आरोपींकडे सापडलेल्या अमली पदार्थाचे प्रमाण हे व्यावसायिक वापरासाठीचे होते. आर्यन आणि अरबाज हे अन्य आरोपींच्या संपर्कात होते. शिवाय अरबाजकडे अमली पदार्थ आहे याची आर्यनला जाणीव होती. या आठ आरोपींकडून अमली पदार्थ हस्तगत होणे हा योगायोग नाही. त्यामुळेच हा कट असून आर्यनही त्यात सहभागी असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. या दाव्यासाठी ‘एनसीबी’ने पुन्हा आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला दिला.

व्यावसायिक प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्यास अटक केली जाते. आर्यनला अटक करण्याची कारणे सांगितली गेली होती. कोठडी मागताना त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून त्याला अटक केल्याचा दावा चुकीचा असल्याचेही ‘एनसीबी’ने सांगितले. हे प्रकरण अमली पदार्थ बाळगणे आणि कटाचे असल्याने आर्यनच्या वैद्यकीय चाचणीचा प्रश्न उद्भवत नाही. पंच प्रभाकर साईल प्रकरणाचा दाखला देत तपास, साक्षीदार प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा दावाही सिंह यांनी केला.

रोहटगी यांचा युक्तिवाद..

’‘एनसीबी’चा कारस्थानाचा दावा फेटाळून लावताना रोहटगी यांनी आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले अमली पदार्थ हा योगायोगच असल्याचा दावा केला.

’आर्यनकडे अमली पदार्थ सापडले नाहीत. त्याने त्याचे सेवन केल्याचा पुरावाही नाही. शिवाय अरबाज वगळता तो अन्य आरोपींना ओळखतही नाही.

’अरबाजसह अन्य आरोपींकडून कमी प्रमाणात सापडलेले अमली पदार्थ हे एकत्र करून ते व्यावसायिक वापरासाठी असल्याचे दाखवून आर्यनचा त्याच्याशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे रोहटगी यांनी न्यायालयाला सांगितले.

एनसीबीचा दावा..

११ जण क्रूझवर जाऊन अमली पदार्थाचे सेवन करणार असल्याची माहिती मिळाली होती. छाप्यानंतर ११ पैकी आठ जणांना अटक करण्यात आली आणि त्यातील आठ जणांकडून अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. हे कारस्थान असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला.