कॉपीराईटचा भंग केल्याप्रकरणी निर्माता कमल जैन याला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. कमल आणि अभिनेत्री कंगना रणौत या दोघांच्याही विरोधात कॉपीराईटचा भंग केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. दिद्दाः वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर या पुस्तकाच्या कॉपीराईटचा भंग केल्याचा आरोप या दोघांवर होता.

या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी या दोघांच्या विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावरुन हा खटला सुरु होता. कौल यांच्या म्हणण्यानुसार कंगनाने आपली फसवणूक केली आणि त्या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केलं. तसंच आपल्या कायदेशीर हक्कांचाही तिने भंग केला.

हेही वाचा- “माझी चप्पल आणा”, यामी गौतमच्या फोटोवर ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर

निर्माता कमल यांची बाजू मांडणारे वकील शिरीश गुप्ते यांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांच्या अशिलाला या गुन्ह्याप्रकरणी अटकेची भीती वाटत आहे. कमल जैन हे तपास यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. कमल यांची बाजू ऐकल्यावर तसंच त्यांच्यावरचे आरोप पाहून न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि एन.जे. इनामदार यांच्या खंडपीठाने निर्देश दिले आहेत की जैन यांना १ जुलै २०२१ पर्यंत अटक करता येणार नाही. त्याचबरोबर खार पोलीस जेव्हा बोलावतील तेव्हा जैन यांनी चौकशीसाठी हजर राहावे असे आदेश दिले आहे.

आणखी वाचा- करोनावर मात केल्यानंतर कंगना रनौतने कुटुंबासह केलं सुवर्ण मंदिर दर्शन

कौल यांनी जानेवारी महिन्यात कंगना, तिची बहीण रंगोली आणि निर्माता कमल यांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या. त्यावर कंगनाच्या वकिलांनी आपली बाजू मांडणार असल्याचं सांगितलं. मात्र, एका महिन्यानंतरही त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न आल्यानं आशिष यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले, अनेक दिवस मी पोलीस स्टेशनला खेटे घालूनही त्यांनी माझी तक्रार नोंदवली नाही. शेवटी मला न्यायालयाची मदत घ्यावी लागली, तेव्हा कुठे माझी तक्रार त्यांनी नोंदवली.

कंगनाने दिद्दाच्या विषयावर चित्रपट बनवण्यास काहीही हरकत नाही मात्र, जी संकल्पना, ज्या कथेवर चित्रपट बनवला जात आहे, जो डेटा वापरला जात आहे तो आपण लिहिला आहे आणि त्यासंदर्भात आपण आक्षेप घेत असल्याचं कौल यांनी स्पष्ट केलं होतं. आपण कंगनाला हिरो समजत होतो पण तिनेच आपल्याला धोका दिला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.