मुंबई : मॉडेलची आक्षेपार्ह चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करण्यावरून उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेत्री राखी सावंत हिची कानउघाडणी केली. अशा चित्रफिती प्रसिद्ध करण्याची आवश्यकता काय, एक महिला असून दुसऱ्या महिलेबाबत असे का केले, असा प्रश्न करून नैतिक मूल्यांचे पालन करण्याचेही न्यायालयाने राखी हिला सुनावले. एवढेच नव्हे तर मॉडेलची आक्षेपार्ह चित्रफित समाजमाध्यमावरून काढून टाकण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.
यूटय़ूब आणि अन्य संकेतस्थळांवर या चित्रफिती असल्यास त्या काढून टाकाव्यात आणि त्याबाबतचा अहवाल मंगळवापर्यंत न्यायालयात सादर करावा, असेही न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. ही चित्रफित प्रसारित केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी राखी हिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.