मुंबई : लोकप्रतिनिधींसारख्या जबाबदार पदी असणाऱ्यांनी एकमेकांविषयी आदराने बोलावे, वागावे, असे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. परंतु ते लोकप्रतिनिधींना ऐकूच जात नसल्याचे दिसते. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी त्यांच्याविरोधात दाखल दुसरा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी आपल्या अशिलांसोबत गैरवर्तन करण्यात आल्याचे राणा दाम्पत्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर आम्ही काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात (केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी) म्हटले होते की, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांशी योग्य वर्तन ठेवायला हवे. एकमेकांच्या विचारांचाही आदर करायला हवा. मात्र आम्ही दिलेला हा सल्ला लोकप्रतिनिधींना ऐकूच गेला नसल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे, असे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने नमुद केले.