मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्युची सीबीआय चौकशी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी नकार दिला. दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आली. त्यावेळी, आपण सीबीआयचे वकील म्हणून काम पाहिले आहे, असे नमूद करून न्यायमूर्ती पाटील यांनी आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वत:ला दूर केले. तसेच, याचिका योग्य त्या खंडपीठापुढे सादर करण्याचे स्पष्ट केले.

दिशा हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच, दिशाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोपही सालियन यांनी याचिकेत आहे.

याचिकेनुसार, ८ जून २०२० च्या रात्री दिशाच्या मालवणी येथील निवासस्थानी तिच्या जवळच्या मित्रांसह पार्टी सुरू होती. अचानक शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे, त्याचे अंगरक्षक, अभिनेता सूरज पांचोली आणि डिनो मोरिया तिथे आले. या सगळ्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केल्याचा आरोपही सालियन यांच्यावतीने वकील निलेश ओझा यांनी याचिकेद्वारे केला. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका करून याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकण्याची मागणी आधीच केली आहे.