scorecardresearch

मुलांच्या सर्वागीण विकासासाठी दोन्ही पालकांचे प्रेम, आपुलकी गरजेची!

न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने उन्हाळय़ाच्या सुट्टीसाठी ५ जूनपर्यंत मुलाचा ताबा वडिलांना दिला.

अल्पवयीन मुलाचा ताबा काही दिवसांसाठी पित्याकडे देताना न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

मुंबई : मुलांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांना दोन्ही पालकांचे प्रेम, आपुलकी मिळणे आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवणे आवश्यक आहे. त्यामुळे विभक्त झालेल्या पालकांनी मुलांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांच्यातील भांडण, राग, द्वेष बाजूला ठेवायला हवे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच सात वर्षांच्या मुलाचा ताबा काही दिवसांसाठी वडिलांकडे सोपवताना त्याला विरोध करणाऱ्या महिलेची याचिका फेटाळली.

न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने उन्हाळय़ाच्या सुट्टीसाठी ५ जूनपर्यंत मुलाचा ताबा वडिलांना दिला. मुलांच्या वडिलांची मागणी मान्य करताना विभक्त झाले असले तरी मुलांप्रती दोन्ही पालकांच्या समान जबाबदाऱ्या असतात. त्यात मुलांचे संगोपन आणि विकासाची प्राथमिक जबाबदारी पालकांची असते. मुलांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांना दोन्ही पालकांचे प्रेम, आपुलकी आणि गुणवत्तापूर्ण वेळ मिळणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे आपल्यासमोरील पक्षकारांनीही त्यांच्यातील कटुता दूर ठेवावी आणि मुलाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला.

या वयात मुलांना दोन्ही पालकांचे प्रेम, आपुलकी, वेळ मिळाला तर मुलांची बुद्धिमत्ताही चांगली होण्यास मदत होते, असेही न्यायालयाने म्हटले.

या प्रकरणातील दाम्पत्याचा २०१२ मध्ये विवाह झाला होता आणि एप्रिल २०१५ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर एक वर्षांने जोडपे सप्टेंबर २०१६ मध्ये विभक्त झाले. विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांची घटस्फोटाचा अर्ज कुटुंब न्यायालयात प्रलंबित आहे. वडिलांनी ३० एप्रिल ते ५ जून या उन्हाळय़ाच्या सुट्टीत मुलाचा ताबा मिळण्याची परवानगी मागतिली होती. ती कुटुंब न्यायालयाने मान्य केली होती. परंतु मुलाचा कायमस्वरूपी ताबा असलेल्या याचिकाकर्तीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच वांद्रे येथील कुटुंब न्यायालयातील मुलांना भेटण्यासाठी आरक्षित असलेल्या जागेत वडिलांना मुलाला एका दिवसासाठी भेटण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. तसेच सासूच्या निधनानंतर मुलाची काळजी घेणारी व्यक्ती पतीच्या घरी नसल्याचे कारणही याचिकाकर्तीने न्यायालयाला सांगितले. तर परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज करताना निश्चित केलेल्या अटींवर स्वाक्षरी करताना याचिकाकर्तीने मुलाचा काही दिवसांसाठी ताबा देण्याचेही मान्य केले होते. परंतु आता ती या अटीचे उल्लंघन करीत असल्याचा दावा मुलाच्या वडिलांकडून करण्यात आला.

मुलाशी संवाद साधल्यावर ताबा

न्यायमूर्ती जाधव यांनी आपल्या वैयक्तिक दालनात मुलाशी संवाद साधला. त्या वेळी हा मुलाची देहबोली, वागणूक, उत्तरे यावरून तो त्याच्या वयापेक्षा अधिक हुशार आणि सजग असल्याचे न्यायमूर्तीना दिसून आले. मुलाचे वडिलांशी असलेले भावनिक बंध दृढ असल्याचेही दिसले. या सर्व बाबी नमूद करुन न्यायालयाने ५ जूनपर्यंत मुलाचा ताबा वडिलांकडे दिला. मात्र त्याच वेळी मुलाला देशाबाहेर घेऊन जाऊ नये, मुलाच्या इच्छेनुसार त्याला आईशी बोलू द्यावे, अशी अट न्यायालयाने मुलाच्या पित्याला घातली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bombay high court observations when handing over custody of minor to father zws