लाच देऊन मी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. परंतु त्याचा मला सातत्याने पश्चाताप होत आहे. त्यापायी प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अपराधी भावनेतून मी अद्याप नोकरीही स्वीकारलेली नाही. त्यामुळे माझी ही पदवी काढून घेण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाला द्यावेत’, अशी २६ वर्षांच्या तरुणाने केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा फेटाळून लावली आणि, त्याचवेळी ‘जे झाले ते विसरून आयुष्यात पुढे जा’, असा सल्लाही या तरूणाला दिला.

जळगाव येथील रहिवासी असलेल्या वैभव पाटील याने सन २०११ मध्ये अभियांत्रिकीतून पदवी पूर्ण केली. मात्र त्याने अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षांचा गणिताचा पेपर मित्राच्या सांगण्यावरून २० हजार रूपयांना विकत घेतला होता. केल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगत त्याने याआधीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र पदवी रद्द करण्याची मागणी न्यायालयाने तेव्हाही फेटाळली होती. ‘फसवणूक करून शैक्षणिक पदवी मिळवल्याच्या मुद्दय़ावरून ती रद्द करण्याचे वा काढून घेण्याची तरतूद कायद्यात नाही’, असे कारण त्यासाठी न्यायालयाने दिले होते. परंतु, ‘या कृत्याचा मला खूपच त्रास होत आहे. मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊनही मी त्या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडू शकलेलो नाही. अपराधीपणाची जाणीव झाल्यापासून मी कुठली नोकरीही स्वीकारलेली नाही. या सगळ्या त्रासातून आपली सुटका म्हणून आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि पदवी रद्द करण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाला द्यावेत’, अशी विनंती वैभव पाटील याने न्यायालयाकडे पुन्हा केली होती.

न्यायमूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी वैभव पाटीलच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने त्याला असे आदेश दिले जाऊ शकत नसल्याचे समजावले. ‘तुला येथील निर्णय मान्य नसल्यास सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दे किंवा याचिका ऐकली जावी असे वाटत असेल तर फसवणुकीद्वारे पदवी मिळवण्यासाठी कुणाला आणि केव्हा लाच दिली याचा, लाच घेणाऱ्यांच्या नावानिशी तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर कर’, असे न्यायालयाने सुचवले. मात्र ‘माझ्यामुळे त्यांना त्रास नको आणि त्यांची नावे मी देऊ शकत नाही’, असे पाटीलने नमूद केले. त्यावर न्यायालयाने त्याला याचिका फेटाळून लावण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचे सांगितले. त्याचवेळी, ‘तुझ्याप्रती आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे’, असे सांगत, ‘झाले गेले विसरून जा आणि पुढील आयुष्य जग’, असा सल्लाही त्याला दिला.