मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांना लक्ष्य करून तयार करण्यात आलेली एआय-निर्मित डीपफेक छायाचित्रे आणि चित्रफिती तात्काळ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जवळपास २८ संकेतस्थळांना दिले आहेत. न्यायालयाने या संकेतस्थळाना शिल्पा हिची डिपफेक छायाचित्रे आणि चित्रफिती हटवण्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे.

या छायाचित्रे आणि चित्रफितींमुळे शिल्पा हिच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाले असून त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे निरीक्षणही न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने उपरोक्त आदेश देताना नोंदवले. शिल्पा हिने तिच्या याचिकेत २८ विविध ई-कॉमर्स व्यासपीठांना प्रतिवादी केले होते व त्यांना तिची डीपफेक छायाचित्रे आणि चित्रफिती हटवण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या साहित्याचा विचार करता शिल्पा हिचे नाव, व्यक्तिमत्त्व, छायाचित्रांचा गैरवापर करण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. एआय मजकूर तयार करणाऱ्या संकेतस्थळांनी शिल्पा हिची डीपफेक आणि इतर एआय-निर्मित अश्लिल छायाचित्रे, चित्रफिती तयार करून संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे शिल्पा हिच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन झाले असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली डीपफेक आणि एआय-निर्मित अश्लील छायाचित्रे, चित्रफिती ही संबंधित व्यक्तीसाठी त्रासदायक असतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिमा मलिन होते. याशिवाय, भारतीय संविधानाने दिलेल्या खासगी आयुष्य जगण्याच्या आणि सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकारांचेही उल्लंघन होते, असे निरीक्षण देखील न्यायालयाने शिल्पा हिला दिलासा देताना नोंदवले. एखाद्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्तिच्या संमतीशिवाय तिचे अशाप्रकारे व्यावसायिक शोषण करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तसेच व्यावसायिक फायद्यासाठी डिजिटल व्यासपीठांवर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची बेकायदेशीररीत्या शोषण करणारी सामग्री प्रसिद्ध करणे याचे कोणत्याही स्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने आदेशआत नमूद केले.