मुंबई : आयुष्य एकदाच मिळते आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, असे निरीक्षण नोंदवून गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून अरबी समुद्रात तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या तीन परदेशी जहाजांवरील ५० खलाशांची तातडीने सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.
आम्हाला तुमच्या निर्जीव जहाजांपेक्षा त्यावरील सजीव माणसांची सर्वाधिक चिंता आहे, असे खडेबोल सुनावत न्यायालयाने या ५० खलाशांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने दिले होते. त्यानुसार, या ५० खलाशांना जहाजावरून मुंबईत आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी, तुम्हाला जहाजांवर परत जायचे आहे का, अशी विचारणा न्यायालयाने या खलाशांना केली. तेव्हा, त्यांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. तसेच, जहाजांवर प्रचंड गैरसोयी असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणालाही जहाजावर परतण्याची इच्छा नसल्याचे खलाशांनी न्यायालयाला सांगितले. जहाजांवर ते केवळ पोळ्या आणि पाण्यावर जगत होते. त्यांना दररोज केवळ ३०० मिलिलिटर पाणी मिळत असल्याची तक्रारही त्यांनी न्यायालयाकडे केली.
न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. तसेच, या जहाजांच्या मालकांना मानवी जीवाचे मोल नसून त्यांना फक्त त्यांच्या जहाजांची आणि व्यावसायिक नफ्यांची चिंता असल्याचे खडेबोल न्यायालयाने सुनावले. या कर्मचाऱ्यांना केवळ ३०० मिलिलिटर पाणी कसे देऊ शकता? आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही दररोज यापेक्षा जास्त पाणी मिळते. मानवी जीवनाशी असे वागणे आम्ही सहन करणार नाही. प्रत्येकाला आयुष्य एकदाच मिळते, असा पुनरुच्चारही न्यायालयाने केला. त्याचप्रमाणे, न्यायालय मानवी जीवांची काळजी घेईल, जहाजांचे मालक त्यांच्या ताब्यात घेतलेल्या जहाजांची काळजी करू शकतात, अशी टिप्पणी करून यलो गेट पोलिसांना या ५० खलाशांसंदर्भातील सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
प्रकरण काय ?
मुंबईपासून ११ सागरी मैल अंतरावर अरबी समुद्रात अवैध इंधन तेल आणि डांबराचे हस्तांतरण करताना तटरक्षक दलाने ही तीन जहाजे ताब्यात घेतली होती. एमटी अस्फाल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया अशी तिन्ही जहाजांची नावे असून त्यावर ५० हून अधिक भारतीय खलाशी अडकले होते. या ५० खलाशांपैकी सात जणांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. आपण फेब्रुवारी महिन्यापासून या जहाजांवर अडकलो असून अत्यंत कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह राहत असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने यलो गेट पोलिसांना सर्व ५० खलाशांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सर्व खलाशांची तिन्ही जहाजांवरून सुटका करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न
ही जहाजे समुद्रात असून न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही १२ तासांच्या विशेष मोहिमेद्वारे सर्व खलाशांना यलो गेट पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती तटरक्षक दलाकडून न्यायालयाला देण्यात आली. त्याचवेळी, आता या जहाजांमध्ये कोणीही नसून त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने जहाजांच्या मालकांना यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
