मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील एका शाळेच्या अध्यक्षांना अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

 न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या एकलपीठाने गणपतराव पाटील यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पाटील यांनी फटकारल्यानंतर काही तासांनी या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. विद्यार्थ्यांच्या आजोबांनी याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

पाटील यांनी या विद्यार्थ्यांला  फटकारले होते आणि त्यामुळे हा विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत गेल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे न्यायालयाने पाटील यांना दिलासा नाकारताना नमूद केले. आपला नातू सिम्बॉलिक इंटरनॅशनल शाळेत दहावीत शिकत होता. पाटील हे या शाळेचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी शाळेच्या मुख्याध्यापिक होत्या.  तक्रारीनुसार, १ एप्रिलला त्यांना शाळेत बोलावण्यात आले आणि नातवाला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले.  आपण फुटबॉल खेळत असताना गोलपोस्टच्या रक्षकाने अनवधानाने एका मुलीला धडक दिली आणि ती जखमी झाली. त्यानंतर पाटील यांनी त्याला आक्षेपार्ह भाषेत फटकारल्याचे नातवाने आपल्याला सांगितल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 

पाटील यांनी या विद्यार्थ्यांला ‘‘असंस्कृत’’ असल्याचे, त्याला सुधारण्याची संधी नाही आणि तो ‘‘झोपडपट्टीतील मुलगा’’ असल्याचेही सुनावले होते, हेही न्यायालयाने आदेशात नमूद आहे. पाटील यांचे बोलणे आक्षेपार्ह आहे. शाळाप्रमुख विद्यार्थ्यांना फटकारू शकतात. परंतु त्यांचे शब्द विद्यार्थ्यांला नैराश्येच्या गर्तेत नेतील असे नसावेत. तक्रारदाराच्या जबाबाचा विचार केला तर पाटील यांनी या विद्यार्थ्यांला बेजबाबदारपणे शिवीगाळ केली, असेही निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.