मुंबई : मराठी भाषा वादाप्रकरणी न्यायालयाच्या आवारात अॅमेढॉनच्या वकिलावर हल्ला केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते अखिल चित्रे यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे निरीक्षणही न्यायालयाने चित्रे यांना दिलासा नाकारताना स्पष्ट केले.

प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर), तपासाची कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब यांचा विचार करता, आरोपीने गुन्हा केला नाही असे म्हणता येत नाही. उलट, सादर केलेल्या पुराव्यांतून अन्य आरोपींसह याचिकाकर्त्याने गुन्हा केल्याचे आणि त्यात त्याचा सहभाग असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षणही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजीत भोसले यांच्या खंडपीठाने नोंदवले.

तत्पूर्वी, अॅमेझॉन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मराठीच्या मुद्यावरून वाद सुरू होता. त्यावरील सुनावणीनंतर अॅमेझॉनचे प्रतिनिधीत्व करणारे वकिल दिंडोशी न्यायालयातून बाहेर पडताना तीन अज्ञान व्यक्तींनी त्यांचे नाव विचारून त्यांना मारहाण करून पळ काढला. काही वकीलांनी चित्रे यांना न्यायालयाच्या आवारातील वाहनतळ परिसरातून त्यांचे वाहन काढताना पाहिले. तसेच वकिलाला मारहाण करणाऱ्यांपैकी एक व्यक्तीही त्यांच्या गाडीत बसल्याचे पाहिल्याचा दावा केला. परंतु, आपला या हल्ल्यात सहभाग नव्हता, याबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हती. असा बचाव चित्रे यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला होता. परंतु, त्यांचा हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. त्याचप्रमाणे, २०२१ पासून चित्रे यांना मिळालेला अंतरिम दिलासा वाढविण्यासही न्यायालयाने याचिका फेटाळताना नकार दिला.

प्रकरण काय ?

अॅमेझॉन अॅपवर मराठी भाषेचा पर्याय नसल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून अमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांना पत्र पाठवण्यात आले. तसेच, अॅपवर मराठी भाषेचा समावेश करण्यास सांगितले होते. अॅपवर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमसारख्या प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु, मराठी भाषेचा पर्याय नसल्याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसेकडून अॅमेझॉनचे भित्तीपत्रक फाडल्याचा आरोप करून अॅमेझॉन ऑनलाइन पोर्टलने न्यायालयात मनसेविरुद्ध अनेक दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल केले होते.