मुंबई : गीतांजली समूहाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) आरोपी करण्याची मागणी उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.काही बँक अधिकाऱ्यांनी गीतांजली समूहातील सदस्यांशी संगनमत करून कथित फसवणूक केली होती. ही फसवणूक पीएनबी बँकविरुद्ध होती आणि त्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. थोडक्यात, या फसवणूक प्रकरणात पीएनबी बँक स्वतःच पीडित आहे. त्यामुळे, बँकेला आरोपी म्हणून समाविष्ट करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने प्रकरणातील आरोपी नितीन शाही याने केलेली याचिका फेटाळताना नोंदवले. न्यायालयाने शाही याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावताना ही रक्कम उच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेश दिले.

बँकेला आरोपी करण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर प्रकरणात आठव्या क्रमांकाचे आरोपी असलेल्या शाही याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपपत्रात बँक अधिकारी आणि गीतांजली समूहातील कर्मचाऱ्यांचा कट, कारस्थान नमूद असल्याने बँकेलाही जबाबदार धरले पाहिजे, असा दावा शाही याने केला होता. दुसरीकडे, गीतांजली समूहाशी संबंधित व्यवहारांमध्येच पीएनबीला सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. फसवणुकीत गीतांजली समूहाला फायदा झाला असून बँकेला तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे दोघांना समान स्तरावर ठेवता येणार नाही, आरोपपत्रात फसवणुकीसाठी संगनमत केल्याचा आरोप असलेले स्वतंत्र बँक अधिकारी तसेच कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी यांना आरोपी करण्यात आल्याचा दावा करून सीबीआयने शाही याच्या अर्जाला विरोध केला होता. न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद मान्य केला आणि शाही याची याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा
Bombay High Court rules that PNB cannot be made an accused in the Gitanjali Gems fraud case as it is the victim. न्यायालयाने याचिकाकर्त्याला दंडही ठोठावला.

प्रकरण काय ?

मुंबईतील पीएनबीच्या उप महाव्यवस्थापकांच्या तक्रारीवरून १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सीबीआयने याप्रकरणी गुन्हा

दाखल केला होता. या तक्रारीनुसार, काही बँक अधिकाऱ्यांनी इतरांसह बनावट कागदपत्रांच्या आधारावर

बँकेची सुरुवातीला पाच हजार कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप होता. पुढील तक्रारींमध्ये २०१३ ते २०१७ या कालावधीत आणखी दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तची फसवणूक झाल्याचे समोर आले. सध्या प्रकरणी संबंधित खटला विशेष सीबीआय न्यायालयात प्रलंबित आहे.