मुंबई उच्च न्यायालायने मनी लॉड्रिंग प्रकरणी शिवेसनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मागील महिन्यात देखील मुंबई उच्च न्यायालयाने आनंदराव अडसूळ यांचा अर्ज फेटाळला होता.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घरावर छापे टाकल्यानंतर तसेच चौकशीसाठी बोलावल्यानंतर अटकेच्या भीतीने अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी ‘ईडी’चे समन्स रद्द करण्याची मागणीही केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच अटक टाळायची असल्यास कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा त्यांना दिली होती. त्यानुसार अडसूळ यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने त्यांच्या त्या अर्जावर निर्णय देताना अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.

अडसूळ हे बँकेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बँकेत ९८० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्य़ाच्या आधारे ‘ईडी’कडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.