scorecardresearch

मुंबई : पत्रकाराच्या मारहाणप्रकरणी तक्रार रद्द, अभिनेता सलमान खान याला उच्च न्यायालयाचा दिलासा

पत्रकाराला मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरोधात दाखल तक्रार उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली.

bombay high court relief actor salman khan
अभिनेता सलमान खान

पत्रकाराला मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरोधात दाखल तक्रार उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. त्यामुळे सलमान याला दिलासा मिळाला आहे. कायद्यासमोर सगळे सारखे असतात. त्यामुळे अभिनेता असो किंवा पत्रकार त्यांनाही कायद्याचे पालन करावेच लागेल, अशी टिप्पणी न्यायालयाने मागील आठवड्यात केली होती. तसेच कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात सलमान याने केलेल्या अपिलावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने गुरुवारी याप्रकरणी निर्णय देतान सलमान याने दाखल केलेले अपील मान्य केले. तसेच त्याच्याविरोधातील तक्रार रद्द केली.

हेही वाचा >>> “लोकांना उडवायला” ask me सेशन दरम्यान चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणने दिलेलं उत्तर चर्चेत

सलमान सायकल चालवत असताना त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेखने शिवीगाळ व मारहाण केली, असा आरोप करून स्थानिक पत्रकार अशोक पांडे याने अंधेरी न्यायालयात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने सलमान व त्याच्या अंगरक्षकाला समन्स बजावून ५ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, सलमान याच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवण्यापूर्वी युक्तिवादाच्या वेळी पोलिसांत तक्रार नोंदवताना आणि नंतर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करताना पांडे यांनी दिलेल्या माहितीतील तफावतीवर न्यायालयाने बोट ठेवले होते. पोलिसांत तक्रार नोंदवताना सलमान याने आपला फोन हिसकावल्याचे, तर दंडाधिकाऱ्यांसमोरील तक्रारीत मात्र मारहाण केल्याचे पांडे यांनी म्हटले होते. दोन महिन्यांनी तक्रार करण्याच्या पांडे यांच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता. दंडाधिकाऱ्यांनी सलमान याला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रियेचे योग्य ते पालन केले नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 11:57 IST

संबंधित बातम्या