लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणात फरारी असलेला मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास यांच्यावरून उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. मंत्र्यांची मुले गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र, पोलिसांना सापडत नाहीत ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही ? मुख्यमंत्रीही या प्रश्नी गप्प का ? ते एवढे हतबल झाले आहेत की ते आपल्याच मंत्र्याविरुद्ध बोलू शकत नाहीत ? अशी प्रश्नांची सरबत्ती करून न्यायालयाने गोगावले पुत्राला शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत पोलिसांपुढे शरणागती पत्करण्याचे अथवा आम्ही आदेश देऊ असा इशारा दिला.

न्यायालयाच्या या इशाऱ्यानंतर, मंत्री भरत गोगावले विकास यांच्याशी संपर्क साधून त्यांना शरण येण्यास सांगतील, अशी ग्वाही राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयात दिली. गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश या दोघांना अटक करण्यात टाळाटाळ का होत आहे ? असा प्रश्न देखील न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने उपस्थित केला.

त्यानंतर प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी आले असता, मंत्री स्वत: आरोपींशी संपर्क साधतील आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगतील, असे आश्वासन महाधिवक्ता साठ्ये यांनी न्यायालयाला दिले. त्याची दखल घेऊन त्यांना शुक्रवारी सुनावणीआधी म्हणजेच सकाळी ११ पूर्वी विकास आणि महेश याना आत्मसमर्पण करण्यास सांगा, असे आदेश न्यायालयाने दिले.

प्रकरणाची पार्श्वभूमी

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान डिसेंबर २०२५ मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रस यांच्यातील गटात हाणामारी झाली. या प्रकरणात माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यासह कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास आणि पुतण्या महेश व अन्य काही जणांविरोधात महाड पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला.