मुंबई : मानीव अभिहस्तांतरण मानल्या गेलेल्या एखाद्या करारावर आधीच मुद्रांक शुल्क आणि दंड भरण्यात आला असेल, तर केवळ मालमत्तेचे बाजारमूल्य वाढले आहे या कारणास्तव, त्यानंतरच्या हस्तांतरण दस्तऐवजावर पुन्हा नवीन मुद्रांक शुल्काची मागणी करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

”ठक्कर इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी”वरील ९.२७ लाख रुपयांच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्काची मागणी रद्द करताना न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने उपरोक्त निर्णय दिला. त्यानंतरचा हस्तांतरण दस्तऐवज हा केवळ मूळ व्यवहाराची पूर्तता करणारा भाग होता, त्याला नवीन विक्री मानले जाऊ शकत नाही, असेही एकलपीठाने स्पष्ट केले. एकदा का ”विक्री करार” हा ”मानित अभिहस्तांतरण” म्हणून ग्राह्य धरला गेला आणि सक्षम प्राधिकरणाने त्यावर निश्चित केलेले मुद्रांक शुल्क व दंड स्वीकारला, तर केवळ मालमत्तेचे बाजारमूल्य वाढले म्हणून नंतरच्या हस्तांतरण दस्तऐवजाला नवीन मुख्य दस्तऐवज मानले जाऊ शकत नसल्याचा पुनरूच्चारही न्यायालयाने केला.

”ठक्कर इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी” आणि ”हर्मीस मिराज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड” यांच्यात पुणे जिल्ह्यातील जमिनीबाबत ९ जुलै १९९८ रोजी झालेल्या ”विक्री करारा”तून हा वाद निर्माण झाला होता आणि न्यायालयात पोहोचला होता. या करारानुसार, मालमत्तेचा ताबा खरेदीदाराकडे सोपवण्यात आला होता. मुद्रांक शुल्क निश्चित करण्यासाठी हा करार जप्त केल्यानंतर, कंपनीने २४ ऑक्टोबर २०११ रोजी ८०,१५० रुपये कमी असलेले मुद्रांक शुल्क आणि १.६० लाख रुपयांचा दंड भरला. त्यानंतर, १६ जानेवारी २०१२ रोजी दोन्ही पक्षांनी त्याच जमिनीसाठी एक ”अभिहस्तांतरण दस्तऐवज” तयार केला. या दस्तऐवजात आधीच्या कराराचा उल्लेख करून, त्यावर मुद्रांक शुल्क आणि दंड भरल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनीने यानंतरच्या दस्तऐवजावर १०० रुपये मुद्रांक शुल्क भरले.

मात्र, नंतर एका लेखापरीक्षण आक्षेपामध्ये या शुल्काच्या गणनेवर आणि आधी भरलेल्या रकमेच्या समायोजनावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर, संबंधित प्राधिकरणांनी २०११ च्या ”वार्षिक दर विवरणपत्रा”नुसार मालमत्तेचे बाजारमूल्य विचारात घेऊन ९.२७ लाख रुपयांची तूट असल्याचे निश्चित केले होते. मार्च २०१६ मध्ये एक मागणी नोटीस बजावण्यात आली होती, पुढे, १२ ऑक्टोबर २०१७ रोजी आणखी एक नोटीस देण्यात आली. न्यायालयाने, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम २५ मधील ”स्पष्टीकरण १”नुसार, मालमत्तेचा ताबा खरेदीदाराकडे हस्तांतरित केला जातो किंवा हस्तांतरित करण्याचे मान्य केले जाते, तेव्हा अशा विक्री कराराला ”मानित अभिहस्तांतरण” मानले जाते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

म्हणून नंतरचे दस्तावेज ”नवीन विक्री” नाही

न्यायालयाने कलम ४ चाही संदर्भ दिला. त्यानुसार, एखादा व्यवहार पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केला जातो, तेव्हा मुख्य दस्तऐवजावर विहित दराने मुद्रांक शुल्क भरावे लागते. तर इतर दस्तऐवजांवर प्रत्येकी १०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जात असल्याची तरतूद आहे. तथापि, या प्रकरणी मालमत्ता, मोबदला किंवा व्यवहाराच्या मुख्य अटींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे नमूद करून केवळ काळ लोटल्यामुळे नंतरचा दस्तऐवज हा ”नवीन विक्री” ठरत नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवले.

जिल्हाधिकाऱ्यांचा शेरा लेखापरीक्षण आक्षेपाद्वारे रद्द होत नाही

केवळ लेखापरीक्षण आक्षेपाच्या आधारे आधी दिलेला मुद्रांक शुल्काचा शेरा रद्द करता येणार नाही, विशेषतः तो शेरा रद्द करण्याचा कोणताही आदेश पारित झालेला नसल्यास या तरतुदीचे पालन अनिवार्य असल्याचेही न्यायमूर्ती बोरकर यांनी आदेशात नमूद केले. तसेच, मुद्रांक शुल्क आणि दंड स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला शेरा, केवळ एका लेखापरीक्षण आक्षेपाद्वारे रद्द केला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, १२ ऑक्टोबर २०१७ रोजीची मुद्रांक शुल्क मागणीची नोटीस न्यायालयाने रद्द केली.