मुंबई:  कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पाच्या प्रस्तावित कांजूरमार्ग येथील कारशेडचा वाद या जागेच्या दावेदारांकडून आपापसात चर्चा करून सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, आमचे त्यावर लक्ष आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने योग्यवेळी योग्य निर्णय देऊ,असे नमूद करून उच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सोमवारी फेटाळली. त्यामुळे प्रकल्पाला दिलेली स्थगिती तूर्त कायम राहणार आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी अ‍ॅड्. सोनल यांच्यामार्फत सोमवारी या प्रकरणी हस्तक्षेप याचिका पुन्हा सादर केली. हा जनहितार्थ प्रकल्प असून स्थगितीच्या आदेशामुळे तो बंद आहे. लोकलप्रवासात पडून दरवर्षी तीन हजार नागरिक जीव गमावतात. ही बाब लक्षात घेता मुंबईसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे हे त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

या कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्यात वाद सुरू आहे. ही जागा मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला दिली होती. केंद्र सरकारला या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.