मुंबई : ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) उत्तीर्ण झालेल्या ‘बीएचएमएस’ डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी मंगळवारपासून सुरू केली आहे. या विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने पुकारलेल्या बेमुदत संपाची मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी दखल घेतली. तसेच, आयएमए, मार्ड आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस बजावून प्रकरणाची सुनावणी दुपारी एक वाजता ठेवली आहे.

विविध वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या वृत्तांची दखल घेऊन प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याप्रकरणी ‘सुओ मोटो’ याचिका दाखल करून घेतली.

गेल्या मंगळवारपासून डॉक्टरांनी हा संप पुकारला असून त्यात शासकीय रुग्णालयातील ‘मार्ड’चे डॉक्टरही सहभागी झाले आहेत. त्यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्यसेवेवर काही अंशी परिणाम होत आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून ‘सीसीएमपी’ प्रमाणपत्रधारक ‘बीएचएमएस’ डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून शांततापूर्ण संप पुकारला.