मुंबई : वाहने कशी चालवावीत आणि रस्ता कसा ओलांडावा ? याबाबत म्हणजेच वाहतूक नियमांविषयी नागरिकांनी विकसित देशांकडून बोध घेतला पाहिजे. तशी वेळ आता आली आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने केली. तसेच, रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वाढीव नुकसानभरपाई मंजूर केली.

नागरी कर्तव्यांच्या पालनाची कोणतीही सक्ती नसली तरी भारतीय नागरिकांनी आता नागरी भान जोपासण्याची आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी स्वतःहून तसे केले पाहिजे, असे निरीक्षणही न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने नोंदवले. भारतीय नागरिक परदेशात जातात, तेव्हा ते वाहतुकीचे सर्व नियम आणि कायदे काटेकोरपणे पाळतात.

परंतु, देशात परतल्यावर किंवा येथे वास्तव्य करत असताना येथील नियम आणि कायदे का पाळत नाही ? हे अनाकलनीय आहे. तसेच, नियमांचे पालन न करण्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात प्रामुख्याने स्पष्ट केले.

घरातील वडीलधारी मंडळी आणि पालक स्वतः वाहन चालवताना किंवा रस्ता ओलांडताना नियमांचे उल्लंघन करतात. परिणामी, मुलांसमोर चुकीचा आदर्श ठेवला जातो आणि मुलेही त्यांचेच अनुकरण करतात यावर भर देताना म्हणूनच, वाहन चालवताना आणि रस्ता ओलांडताना नियमांचे पालन करणे हे वडीलधाऱ्यांचे आणि पालकांचे नैतिक कर्तव्य व जबाबदारी आहे. ती नीट पार पाडल्यास मुले नियमांचे उल्लंघन कसे करावे हे शिकण्याऐवजी, आपल्या पालकांकडून नियमांचे पालन करण्याचे हे मूलभूत नागरी भान शिकतील, असे न्यायालयाने म्हटले. मुले जे पाहतात, तेच वेगाने आत्मसात करतात असे म्हटले जाते, ते याबाबतीत अगदी यथार्थ असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.

नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी

या देशातील पादचाऱ्यांनीही नियमांचे आणि कायद्यांचे पालन करण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे, असे देखील न्यायालयाने म्हटले. अनेकदा नागरिक वाहतुकीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करून रस्ता ओलांडतात. परिणामी, अपघाती मृत्यू किंवा दुखापत होण्याच्या घटना घडतात, एक जबाबदार नागरिक म्हणून, आपण रस्ता ओलांडताना नियमांचे पालन करण्याची आणि वाहतुकीच्या संकेतांचे अनुसरण करण्याची आता वेळ आली आहे असे न्यायालयाने म्हटले.

केवळ पादचारीच नव्हे, तर वाहने विशेषतः दुचाकी चालवणारेही अनेकदा वाहतुकीचे संकेत तोडतात आणि नियमांचे पालन करत नाहीत. वाहतूक पोलिस चांगले काम करत असले, तरी त्यांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे न्यायमूर्ती जैन यांनी आदेशात नमूद केले.

चालकासह मृताची निष्काळजीही कारणीभूत

मृत व्यक्ती अंशतः पक्षाघाताने ग्रस्त असल्याने, रस्ता ओलांडताना त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवे होते किंवा त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत घ्यायला हवी होती, असे न्यायालयाने आदेशात म्हटले. पादचाऱ्याने केवळ सिग्नलजवळच आणि सिग्नलचे नियम पाळूनच रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

या प्रकरणात, अपघातासाठी काही प्रमाणात मृत व्यक्तीचा निष्काळजीपणाही कारणीभूत होता, असे निरीक्षण एकलपीठाने नोंदवले. त्याचवेळी, रस्ता ओलांडण्यासाठी लंगडत चाललेली व्यक्ती दिसल्यानंतर बसच्या चालकानेही वाहनाचा वेग कमी करायला हवा होता, असेही खंडपीठाने नमूद केले. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम वाढवून १५ लाख रुपये केली.

प्रकरण काय?

मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला पार्किन्सनचा आजार होता आणि अंशतः पक्षाघात झाला होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये रस्ता ओलांडत असताना ठाणे महानगर परिवहनच्या (टीएमटी) बसने त्यांना धडक दिली होती. त्यात मृत व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आणि मार्च २०१३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. मोटार अपघात दावा लवादाने एप्रिल २०१६ मध्ये याचिकाकर्त्यांना १३ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. या आदेशाविरुद्ध तसेच नुकसानभरपाईची रक्कम वाढवून मिळावी या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.