मुंबई : पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर किरकोळ कागदपत्रांवरून उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने निलंबित किंवा रद्द केले जात असल्याच्या कारवाईला मुंबई-ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट मालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, एकाचवेळी दोन ठिकाणी दाद मागता येणार नाही, असे स्पष्ट करून कारवाईविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचे आदेश न्यायालयाने बुधवारी ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीच्या ड्रमबीटसह अन्य याचिकाकर्त्यांना दिले. ड्रमबीट हे हॉटेल बिंदूमाधव ठाकरे यांनी सुरू केले होते. त्यांच्या निधनानंतर ते त्यांच्या पत्नीच्या नावे आहे.

पुण्यातील घटना घडल्यापासून काही कागदपत्रे न देण्यासारख्या किरकोळ मुद्द्यांवर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले जात आहेत. कुठे तरी काही घडले म्हणून आम्हाला लक्ष्य केले जात आहे, असा दावा करून बार आणि रेस्टॉरंट मालकांनी वकील वीणा थडानी यांच्यामार्फत गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाला धाव घेतली होती. बारमालकांनी या प्रकरणी सहाहून अधिक याचिका दाखल केल्या होत्या. तथापि, सुट्टीकालीन खंडपीठाने त्यावर तातडीने सुनावणी देण्यास नकार दिला. त्याचवेळी, या याचिका सोमवारी पुन्हा एकदा सुट्टीकालीन खंडपीठासमोर सादर करण्याची सूचना केली होती. त्यानंतर, न्यायालयाने या याचिकांची दखल घेतली होती व राज्य सरकारला नोटीस बजावून याचिकाकर्त्यांच्या दाव्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>>जुहू परिसरात इमारत उंचीबाबत वेगवेगळ्या परवानग्यांमुळे घोळ; विमानतळ प्राधिकरणाचा अजब कारभार

त्या पार्श्वभूमीवर, न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर ड्रमबीट हॉटेल आणि अन्य बारमालकांच्या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, याचिकाकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही कारवाईविरोधात अपील दाखल केले आहे आणि त्यांना या आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी सुनावणी दिली जाणार आहे. असे असताना याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयातही याचिका केली आहे, असे अतिरिक्त सरकारी वकील अभय पत्की यांनी न्यायालयाला सांगितले. शिवाय, याचिकाकर्त्यांकडून नियमांचे वारंवार उल्लंघन करण्यात आल्याने परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आल्याचेही पत्की यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांकडे त्याबाबत विचारणा केली. तसेच, एकाचवेळी दोन ठिकाणी अपील केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची सूचना केली.

हेही वाचा >>> चेंबूरमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट, आठजण जखमी

त्यावर, सुरुवातीला तयार नसलेल्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची सूचना मान्य केली. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची तयारी दाखवली. न्यायालयाने त्यानंतर सगळ्या याचिका निकाली काढल्या. दरम्यान, पुणे घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाने मुंबई -ठाण्यातील बारची पाहणी केली. त्यादरम्यान, त्यांना विविध पातळीवर नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर, बार मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून या मुद्द्यांवर वैयक्तिक सुनावणी देणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी २७ मे रोजी उत्पादन शुल्क विभागाने बारचा परवाना निलंबित केला. तसेच, वैयक्तिक सुनावणी दिली जाईपर्यंत बार बंद ठेवण्याचे बजावले. या कारवाईमुळे आपले मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने आपण उत्पादन शुल्क आयुक्तांकडे दाद मागितली. परंतु, त्यांनीही आपल्या अपिलावर सुनावणी घेण्यास नकार दिला, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. तसेच, परवाना निलंबित करण्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाला स्थगिती देण्याची आणि आदेश रद्दबातल करण्याची मागणी केली होती.